शुद्ध ऑक्‍सिजन पुरवणारा हेल्थ बार! 

शुद्ध ऑक्‍सिजन पुरवणारा हेल्थ बार! 

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील प्रदूषणाच्या बातम्यांमुळे संपूर्ण देशामध्येच चिंतेचे वातावरण पसरले. सर्वच मोठ्या शहरांना या समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्‍नही गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला बहुतांश ठिकाणी शुद्ध 'ऑक्‍सिजन'चा पुरवठा करणारी कोणती व्यवस्था मिळाली तर? होय, अशा प्रकारचे 'ऑक्‍सिजन हेल्थ बार' निर्माण करण्याचे स्वप्न तुषार खोमणे या नवउद्योजकाने 'उज्ज्वल हेल्थ सोल्यूशन्स' या स्टार्टअपच्या स्वरूपात बाळगले आहे. 

तब्बल 25 वर्षे नोकरी केल्यानंतर तुषार खोमणे यांनी आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी 'ब्रेक' घेतला. बदलत्या जीवनशैलीबरोबरच आरोग्याविषयीच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात लोकांना भेडसावत आहेत हे जाणवल्यानंतर त्यांनी यासाठी काहीतरी करायचे ठरविले. आपल्या देशातील नोकरदार वर्गामध्ये असलेला ताणतणाव दूर करण्यासाठी आणि त्यांना सुदृढ आरोग्य देण्यासाठी काय करता येईल याबाबत अभ्यास करत असताना त्यांना 'ऑक्‍सिजन'चे सर्व पैलू, महत्त्व उमगले आणि त्यादृष्टीने काही करण्याची कल्पना सुचली. त्यातून जन्म झाला तो 'उज्ज्वल हेल्थ सोल्यूशन्स' या स्टार्टअपचा. 

आपल्या शरीरामध्ये आहारातून किंवा हवेतून आतमध्ये काय जाते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आरोग्याच्या विषयात काम करायचे असेल तर एक प्रभावी 'मल्टी-थेरपी सिस्टीम' निर्माण केली पाहिजे असा खोमणे यांचा विचार होता. त्यासाठी अरोमा थेरपी, क्रोमा थेरपी आणि म्युझिक थेरपी यांची सांगड त्यांनी घातली. 

खोमणे म्हणाले, ''जवळपास 90 टक्के शुद्ध ऑक्‍सिजन घेण्यासाठी 'ऑक्‍सिजन बार'चा उपयोग होतो. बारटेंडर किंवा टेक्‍निशियनच्या माध्यमातून एकाचवेळी अठरा ग्राहकांना सेवा मिळू शकते. 'डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी आणि प्रोमोशन'कडे (डीआयपीपी) आम्ही ऑक्‍सिजन हेल्थ बारविषयीची संकल्पना व प्रस्ताव पाठविला. त्यानुसार 'डीआयपीपी'ने आम्हाला नोंदणीकृत स्टार्टअप म्हणून प्रमाणपत्र दिले आहे. आता आम्ही विविध ठिकाणी असे हेल्थ बार सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत.'' 
''जपान, अमेरिका, हॉलंड अशा विविध देशांतील विमानतळांवर ऑक्‍सिजन हेल्थ बार कार्यान्वित आहेत. त्याच धर्तीवर पुणे लोहगाव विमानतळावर 'ऑक्‍सिजन हेल्थ बार' सुरू करण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिला आहे. विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या तो विचाराधीन आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे,'' असेही खोमणे यांनी सांगितले. 

ऑक्‍सिजनचे फायदे 

  • अधिक ऊर्जा मिळते 
  • शांत झोप लागते 
  • पचन चांगले होते 
  • प्रतिकारशक्ती वाढते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com