कार्यसुलभतेसाठी 'मशिन लर्निंग'

शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कराराचा मसुदा, मोठा निबंध किंवा विद्यार्थ्यांचे पेपर यात नेमके आवश्‍यक मुद्दे आहेत का, हे शोधून काढणे आता तंत्रज्ञानाच्या मदतीने चुटकीसरशी होऊ शकते. आदित्य खानविलकर यांच्या 'ट्रेंड्‌झलिंक' या स्टार्टअपने तंत्रज्ञानाच्या आधारे अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याविषयी थोडक्‍यात :

'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' आणि 'मशिन लर्निंग' या तंत्रज्ञानाच्या आधारे एखाद्या किचकट वाटणारा लेख किंवा कराराचा मसुदा किंवा अगदी एखाद्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने लिहिलेल्या पेपरमध्ये नेमके आवश्‍यक तेवढे मुद्दे आले आहेत का, हे शोधून काढायचे झाल्यास तुमचा किती वेळ जातो? किमान काही तास या कामासाठी नक्कीच खर्च करावे लागतात; मात्र हेच काम एखाद्या संगणक प्रणालीने केले आणि तुमच्यासमोर अशा किचकट मजकुराची फोड करून थोडक्‍या शब्दांत त्याचे विश्‍लेषण सादर केल्यास? 'ट्रेंड्‌झलिंक' या स्टार्टअपने तंत्रज्ञानाच्या आधारे अशी सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे. 

आदित्य खानविलकर यांनी ही स्टार्टअप स्थापन केली आहे. आदित्य यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून 2010मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 'कॅंपस प्लेसमेंट'मधून त्यांना गुडगाव येथे नोकरी मिळाली; मात्र त्यांनी ती नाकारली. त्यानंतर 'सिस्को' कंपनीमध्ये त्यांनी तीन वर्षे काम केले. 2015 मध्ये अहमदाबादच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'मध्ये शिक्षण घेत असताना आदित्य यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये लक्ष घातले. माहिती-तंत्रज्ञानाच्या (आयटी) लाटेनंतर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानातच भविष्य असल्याचे त्यांनी जाणले. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या आधारे टेक्‍स्ट प्रोसेसिंग व ऍनॅलिटिक्‍सवर काम करण्याचे आदित्य यांनी ठरविले. 

आदित्य म्हणाले, ''आयआयएम अहमदाबादमध्ये शिकत असताना 'न्यूज ऍग्रीगेशन इंजिन'ची पहिली संकल्पना सुचली. कोणत्याही निवडक 19 विषयांवर वेगवेगळा दृष्टिकोन देणाऱ्या बातम्यांचे संकलन करणे, अशी ही संकल्पना होती. 'यूपीएससी' स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ही संकल्पना लोकप्रिय ठरली. पहिली संकल्पना यशस्वी झाल्यानंतर आयआयएम अहमदाबादचे एका माजी विद्यार्थी असलेल्या एका व्यक्तीने 'इ-ट्यूटरिंग'मध्ये निबंधांच्या विश्‍लेषणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याबाबत विचारणा केली. त्यांच्या विनंतीनुसार, ग्राहकांच्या शिक्षणाच्या वेगानुसार कंटेंट पुरविण्याची म्हणजे 'पर्सनालायज्ड लर्निंग'ची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली.'' 

आदित्य यांच्याबरोबर आता आठ जण त्यांच्या स्टार्टअपमध्ये काम करतात. शिक्षण, कायदा आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील ग्राहक सध्या त्यांच्याकडे आहेत. ''अमेरिकेतील शाळांमध्ये सध्या या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. तिथे हा प्रयोग यशस्वी झाला की भारतातील शाळांमध्ये वापरायला सुरवात करणार आहोत. इंग्रजीसह कोणत्याही भारतीय भाषेसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे,'' अशी माहिती आदित्य यांनी दिली. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाला भविष्यात मोठी मागणी राहील. या तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ शकतो. माहिती-तंत्रज्ञानाच्या लाटेनंतर भारतीय अभियंते फक्त सेवा क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करत असल्याची टीका होत असते. 'आयपी बेस्ड' किंवा 'प्रॉडक्‍ट इंडस्ट्री'विषयी चर्चा करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे; पण प्रत्यक्षात काम करणारे आदित्यसारखे फार कमी लोक आहेत. 
- प्रशांत गिरबने, उद्योजक आणि स्टार्टअप मार्गदर्शक