व्हिडिओ ब्लॉगिंगसाठी आता 'हॉटबुक'

शनिवार, 2 सप्टेंबर 2017

एखादी संकल्पना किंवा कृती किंवा गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही काय करता? पुस्तक वाचता की ऑनलाइन सर्च? पण, या सर्व गोष्टी वाचण्याऐवजी व्हिडिओमार्फत थेट तुमच्यापर्यंत पोचल्या तर? याच संकल्पनेवर आधारित 'हॉटबुक' (www.hautebook.com) स्टार्टअपने इन्ट्युटिव्ह व्हिडिओ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. 

ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आपल्यापैकी प्रत्येकजण असेलच असं आता खात्रीपूर्वक म्हणता येईल. गेल्या काही महिन्यांपासून जिओच्या वापरामुळे तर मोबाईलवर इंटरनेट वापरण्यासाठी किती डेटा वापरला जाईल, ही भीतीच नाहीशी झाली आहे. पूर्वी आपल्याला कोणी इमेज किंवा व्हिडिओ पाठवला तर आपण इमेज सहजरीत्या डाउनलोड करत असू; पण व्हिडिओ डाउनलोड करताना खूप विचार केला जात असे. पण आता तसे होत नाही. डेटा स्वस्त झाल्यामुळे व्हिडिओ बघण्याचे प्रमाण वाढले आहे. या बदलत्या परिस्थितीमध्ये आता सोशल मीडियासुद्धा अधिक व्हिडिओकेंद्रित झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

हा बदलता ट्रेंड लक्षात घेत बॉबी जाधव यांनी 'हॉटबुक'हा व्हिडिओ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ट्विटरचा संक्षिप्तपणा, इन्स्टाग्रामची परिणामकारता आणि युजर्सला खिळवून ठेवण्याची फेसबुकची स्टाइल बॉबी यांनी त्यामध्ये एकत्र आणली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट व गुंतवणूकदारांनी या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली असून, पुणे व सिलिकॉन व्हॅली अशा दोन्ही ठिकाणाहून या स्टार्टअपचे काम चालते. 

'हॉटबुक' ही बॉबी यांची चौथी स्टार्टअप आहे. अमेरिकेतील व्यावसायिकांसाठीची मोबाईल कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्म असलेली स्पॉटझॉट, क्‍लाऊड बेस्ड प्रोग्रॅम मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म असलेली सिटेरा आणि कॅल-की टेक्‍नॉलॉजी या तीन यशस्वी स्टार्टअप्स त्यांनी यापूर्वी सुरू केल्या. या तिन्ही स्टार्टअप्सना अनुक्रमे वॅलॅसिस डिजिटल मीडिया, ऍक्‍रयुएन्ट आणि स्वोर्ड पॅरिस या जगविख्यात कंपन्यांनी विकत घेतले आहे. 

बॉबी जाधव म्हणाले, ''एकावेळी दोन किंवा अधिक व्हिडिओ बघण्याची आपली बौद्धिक क्षमता आणि कौशल्य आता विकसित झाले आहे. काही सेकंदांचे हे व्हिडिओ असतील, तर आपण एकावेळी अगदी चार किंवा सहा व्हिडिओसुद्धा पाहतो; मात्र कालावधी मोठा असेल तर ते पाहता येत नाहीत व आपले लक्ष एकाच व्हिडिओवर केंद्रित होते. 'हॉटबुक'मध्ये या सर्व बाबींचा विचार केला आहे. हॉलिवूड चित्रपटांमधील कॉपी केलेली बॉलिवूडमधील दृश्‍ये असतील किंवा चार्ली चॅपलिनची कॉमेडी, या सर्व दृश्‍यांना समर्पक अशा टेक्‍स्टची जोड दिल्यामुळे ग्राहकांपर्यंत योग्य तो संदेश पोचविणे सहज शक्‍य होते. मनोरंजन आणि लाइफस्टाइलशी संबंधित हे व्हिडिओ आणि मजकूर असल्यामुळे ते बघण्याचे प्रमाणही अधिक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक असल्याचेही आमच्याकडील आकडेवारीतून दिसून येते.'' 

बाप्पा अन्‌ ढोल-ताशा.. सर्वकाही व्हिडिओ स्वरूपात 
सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे हे स्वरूप जगभर पोचविण्याचे काम 'हॉटबुक'मार्फत केले जात आहे. त्यासाठी 'हॉटबुक' आणि पुणे महानगरपालिका यांनी एकत्र येऊन अनेक माहितीपूर्ण व नावीन्यपूर्ण व्हिडिओ नेटिझन्ससाठी उपलब्ध करून दिले आहेत. केवळ मंडळांची किंवा गणपतींची माहितीच नव्हे, तर चक्क ऑनलाइन ढोल-ताशा स्पर्धाही आयोजित केली आहे. या स्पर्धेत पुणे- मुंबईसह अमेरिका, दुबई आणि ऑस्ट्रेलियातील ढोल-ताशा पथके सहभागी झाली आहेत. या पथकांचे ढोल-ताशा वादनाचे व्हिडिओ 'हॉटबुक'वर उपलब्ध असून त्यांना वोट करण्याची सुविधा आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी या स्पर्धेतील पथकांचे व्हिडिओ पाहिले आहेत. सर्वाधिक मते मिळविणाऱ्या पथकाला स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती 'हॉटबुक'चे संस्थापक बॉबी जाधव यांनी दिली. 

'हॉटबुक'ची वैशिष्ट्ये 

  • मनोरंजन व लाइफस्टाइलविषयक व्हिडिओ ब्लॉगिंग. 
  • एकाचवेळी अनेक व्हिडिओ पाहता येतात. 
  • 1.1 कोटी वापरकर्ते. 
  • व्हिडिओ पाहिला जाण्याचा सरासरी कालावधी - 30 ते 55 मिनिटे. 
  • 3 कोटी व्हिडिओ दर महिन्याला पाहिले जातात.