"नासा' करणार सौरमालेचा अभ्यास 

यूएनआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : सौरमालेच्या सुरवातीच्या काळाचा अभ्यास करण्याच्या हेतूने अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'ने दोन मोहिमा जाहीर केल्या आहेत. या मोहिमांमध्ये उल्कांचा अभ्यास करून सूर्याच्या जन्मानंतरच्या एक कोटी वर्षांहून कमी कालावधीचा अभ्यास केला जाणार आहे. 

ल्युसी आणि साइक अशी या मोहिमांची नावे आहेत. या मोहिमा अनुक्रमे 2021 आणि 2023 मध्ये राबविल्या जाणार आहेत. ल्युसी हे यान गुरू ग्रहाच्या ट्रोजन या गूढ असलेल्या उल्का समूहाचा अभ्यास करणार आहे, तर साइक हे यान एका दुर्मिळ आणि आतापर्यंत अजिबात अभ्यास न झालेल्या उल्केचा अभ्यास करणार आहे. ऑक्‍टोबर 2021 मध्ये अवकाशात झेप घेणारे ल्युसी हे यान 2025 पर्यंत संबंधित उल्का समूहात पोचण्याचे नियोजन आहे. 2027 ते 2033 या काळात हे यान सहा उल्कांचा अभ्यास करणार आहे. हा उल्का समूह गुरूच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत अडकला आहे. हा उल्का समूह सौरमालेच्या निर्मितीच्या काळातील असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 

साइक हे यान ऑक्‍टोबर 2023 मध्ये अवकाशात झेपावणार आहे. हे यान सौरमालेतील उल्कांचा मुख्य पट्ट्यातील 16 साइक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या उल्केचा अभ्यास करणार आहे. या उल्केचा व्यास 210 किमी असून, यामध्ये पृथ्वीच्या गर्भाप्रमाणेच लोह आणि निकेल या धातूंचे अस्तित्व असल्याचा अंदाज आहे. यासाठी यानाला 2030 पर्यंत पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या तिप्पट अंतर कापावे लागणार आहे.