नव्या सूर्यमालेतही कुणीतरी आहे..!

New solar system
New solar system

न्यूयॉर्क - सर्पाकृती भुजा असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या एका शाखेमध्ये आपली सूर्यमाला आहे. आकाशगंगेत आपल्यासारख्या अनेक सूर्यमाला अस्तित्वात आहेत. अशाचा एका नवीन सूर्यमालेचा शोध शास्त्रज्ञांनी लावला. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन) 'नासा'ने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीसारखेच सात ग्रह या सूर्यमालेतील सूर्याभोवती फिरत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या ग्रहांवर पाणी असल्याची, म्हणजेच जीवसृष्टीही असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

'नासा'ने 22 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली असून, या ग्रहांवर पोहोचण्यासाठी ४० प्रकाशवर्ष लागतील, असेही नासाने म्हटले आहे. 

स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे नासाने हा शोध लावला असून, सूर्यमालेबाहेर एकाच वेळी एवढ्या संख्येने ग्रह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्याला दिसणाऱ्या सूर्याएवढ्याच आकाराच्या दुसऱ्या सूर्याभोवती हे सात ग्रह फिरतात. विशेष म्हणजे या सातपैकी तीन ग्रह त्यांच्या ताऱ्यापासून, जीवसृष्टीस योग्य अशा अंतरावर (हॅबिटेबल झोन) असल्याचे नासाचे म्हणणे आहे. सूर्यमालेबाहेर असल्याने या ग्रहांना 'एक्सोप्लॅनेट्स' असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी एका ताऱ्याभोवती एवढ्या मोठ्या संख्येने पृथ्वीसदृश ग्रह सापडले नसल्याने या शोधाचे विज्ञान क्षेत्रामध्ये कौतुक होत आहे.

'स्पिट्झर' अवकाश दुर्बीण ही 2003 मध्ये अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेली दुर्बीण आहे. 'स्पिट्झर' ही 'इन्फ्रारेड' तरंग लांबीवर काम करणारी दुर्बिण आहे. 

नवीन सूर्यमाले विषयी..
- नवीन सूर्यमालेतील ताऱ्याला 'ट्रॅपिस्ट-वन' नावाने संबोधले जाते
- आपल्या सूर्यापेक्षा हा तारा छोटा व मंद तेजाचा आहे
- हा तारा छोटा म्हणजे सूर्याच्या तुलनेत आठ टक्के वजनाचा आहे. त्याच्या मंद तेजामुळेच त्याच्याभोवताली फिरणाऱ्या ग्रहांचा शोध लावणे सोपे झाले. 
- या ताऱ्याकडे दुर्बिण रोखली असता त्याचा प्रकाश अधूनमधून मंद होताना दिसला. याचमुळे या ताऱ्याभोवती ग्रह फिरत असावेत व त्यांच्यामुळे ताऱ्याचा प्रकाश कमी होत असल्याचे नासाने म्हटले आहे
- शास्त्रज्ञांनी स्पिट्झर दुर्बिणीतून या ताऱ्याची सतत तीन आठवडे निरीक्षणे घेतल्यानंतर या ताऱ्याभोवती सात ग्रह असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
- या ताऱ्याभोवती फिरणारे हे सर्व ग्रह आपल्या मंगळ ग्रहापेक्षा मोठे असावेत. कदाचित ते पृथ्वीच्या तुलनेत 40 ते 140 टक्के वस्तुमानाचे असावेत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
- ट्रॅपिस्ट तारा आपल्या सूर्यापेक्षा खूपच मंद तेजाचा असल्याने त्याच्या जवळच्या ग्रहांवरचे तपमान जास्त नसून ते जीवसृष्टीस पोषक असण्याची शक्यता आहे
- पुढील काळात या ग्रहांचे निरीक्षण हबल हवाई दुर्बीण व जेम्स वेब दुर्बिणीतून केले जाणार आहे. या दुर्बिणीच्या सहाय्याने या ग्रहांवर वातावरण, पाणी व प्राणवायू आहे काय, याचा शोध घेतला जाणार आहे 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com