न्यूयॉर्क - हवेत न उडू शकणाऱ्या डायनोसॉरची अंडी उबण्यास मगर आणि इतर सरिसृप प्राण्यांप्रमाणे तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. डायनोसॉर नष्ट होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
डायनोसॉरची अंडी उबण्यास पक्ष्यांप्रमाणे 11 ते 85 दिवसांचा कालावधी लागत असे, असे पूर्वीचे अनुमान होते. मात्र, डायनोसॉरची शारीरिक रचना पक्षी नव्हे, तर सरिसृप प्राण्यांसारखी असल्याने त्यांची अंडी उबण्याचा कालावधीही अधिक असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. हा निष्कर्ष काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी दोन प्रकारच्या डायनोसॉरच्या अंड्यांचा अभ्यास केला. अंडी उबण्याचा कालावधी अधिक असल्यानेच साडे सहा कोटी वर्षांपूर्वी हे प्राणी नष्ट होण्याच्या कालावधीत डायनोसॉरना तत्कालीन पक्षी आणि इतर सरिसृपांच्या समोर टिकाव धरता आला नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
|