गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व तिसऱ्यांदा सिद्ध!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

"लायगो' वेधशाळा पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतरचे पहिलेच सिग्नल्स

"लायगो' वेधशाळा पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतरचे पहिलेच सिग्नल्स
पुणे - सुमारे दोन वर्षांपूर्वी गुरुत्वीय लहरींचा ऐतिहासिक शोध लावत आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला खरे ठरवत अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या "लायगो' वेधशाळेने पुन्हा एक चांगली बातमी दिली आहे. लायगोच्या शोधकयंत्रणेला (डिटेक्‍टर्स) गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचे पुरावे पुन्हा एकदा मिळाले असून, गेल्या दोन वर्षांत हे तिसऱ्यांदा घडले आहे. गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाला यामुळे पाठबळ मिळाले असून, गुरुत्वलहरीय खगोलशास्त्राच्या आणि कृष्णविवरांच्या अभ्यासाला यातून मोठी गती मिळणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत.

गुरुत्वीय लहरींच्या शोधात लायगो वेधशाळेच्या सोबतीने महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या "आयुका'तील शास्त्रज्ञांनी गुरुवारी या नव्या घडामोडींसंदर्भात माहिती दिली. पृथ्वीपासून सुमारे 3 अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या महाकाय अशा दोन द्विज-कृष्णविवरांच्या महाटकरीतून निर्माण झालेल्या ऊर्जेतून या गुरुत्वीय लहरींची निर्मिती झाल्याचे दिसून आले आहे. लायगो वेधशाळेला मिळालेल्या सिग्नल्सचे विश्‍लेषण (डिकोडिंग) केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आला.

विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यातील शोधानंतर वेधशाळेचे काम तांत्रिक कारणांसाठी थांबविण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वेधशाळा कार्यान्वित झाल्यावर या वर्षी 4 जानेवारी रोजी हा शोध लागला आहे.

काय आहे शोध आणि त्याचे महत्त्व?
सूर्याच्या 31 पट अधिक वस्तुमानाचे एक कृष्णविवर आणि सूर्याच्या 19 पट अधिक वस्तुमानाचे दुसरे कृष्णविवर यांच्यात झालेल्या टकरीतून या गुरुत्वीय लहरींची निर्मिती झाल्याचे या शोधातील निरीक्षणे सांगतात. महत्त्वाचे म्हणजे, या आधीच्या शोधांच्या तुलनेत तब्बल दुप्पट अंतरावरच्या कृष्णविवरांच्या टकरीची नोंदही आता लायगो वेधशाळा घेऊ शकली आहे. त्यामुळे या वेधशाळेच्या निरीक्षणक्षमतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ही तर केवळ सुरवात!
या शोधाबद्दल बोलताना आयुकातील शास्त्रज्ञ आणि गुरुत्वीय लहरींच्या शोधात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रा. संजीव धुरंधर म्हणाले, ""मूलभूत भौतिकशास्त्राला एक नवी आणि वेगळी दिशा देणारा हा शोध ठरणार आहे. गुरुत्वीय लहरींचा शोध विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नवी दालनं खुली करणार आहे.'' तर डॉ. संजीत मित्रा म्हणाले, 'गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करतानाच या शोधामुळे लायगो प्रकल्पाची कार्यक्षमताही सिद्ध केली आहे. भारतात लायगोची वेधशाळा सुरू झाल्यावर या शोधाला गती मिळेल.''