पुण्यातील ‘ड्रोन’चे अमेरिकेत उड्डाण

फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी फ्लाइट-ओएस प्रणालीच्या आधारे विकसित केलेला ‘सर्च अँड रेस्क्‍यू ड्रोन’
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी फ्लाइट-ओएस प्रणालीच्या आधारे विकसित केलेला ‘सर्च अँड रेस्क्‍यू ड्रोन’

पुणे - आपत्तीकाळात मानवी हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच पूर्णतः स्वयंचलित पद्धतीने बाधित क्षेत्राची पाहणी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने करून जीवितहानी टाळणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. पुण्यातील ‘फ्लाइटबेस’ (पूर्वीचे नाव नॅवस्टिक लॅब्ज) या स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘इंटरनेट ऑफ ड्रोन्स’ या प्रणालीच्या आधारे ही यंत्रणा तयार करण्यात आली असून, त्याचे पहिले यशस्वी प्रात्यक्षिक अमेरिकेतील ‘फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी’मधील विद्यार्थ्यांनी नुकतेच घेतले. 

आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असलेला नितीन गुप्ता आणि त्याचे सहकारी प्रदीप गायधनी, सर्वाशिष दास, अचल नेगी, झुबिन प्रियांश यांनी ‘नॅवस्टिक’ ही स्वतःची स्टार्टअप २०१३ मध्ये सुरू केली. नॅवस्टिकचे नाव बदलून नुकतेच ‘फ्लाइटबेस’ असे ठेवण्यात आले. या स्टार्टअपने ‘फ्लाइट-ओएस’ (flyt-os) हे ड्रोन ॲप्लिकेशन फ्रेमवर्क तयार केले आहे. म्हणजे मोबाईलसाठी जशी अँड्रॉइड ही लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिम निर्माण झाली, तशीच जगभरात वापरण्यात येणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांसाठी एक प्रमाणित ऑपरेटिंग सिस्टिम ‘फ्लाइटबेस’ने तयार केली आहे. 

नितीन गुप्ता म्हणाले, ‘‘आपल्या देशासह जगात अनेक ठिकाणी ड्रोनचा वापर होत आहे. मात्र बहुतांश ठिकाणी ते ‘मॅन्युअली’ चालविले जातात. आपण प्रथमच ड्रोनच्या उड्डाणाचा मार्ग आणि त्याच्या कॅमेऱ्यातून मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण हे स्वयंचलित पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनासह मदतकार्यात करण्यात यशस्वी झालो आहोत. बाधित क्षेत्रामध्ये जीवितहानी होणार नाही यासाठी संपूर्ण क्षेत्राचे स्कॅनिंग करून माणसांना शोधणे आणि त्यानुसार मदतकार्याची दिशा ठरविणे हे यामुळे जलदगतीने होऊ शकते. नावीन्यपूर्ण फ्लाइट कंट्रोल आर्किटेक्‍चर, शक्तिशाली ऑनबोर्ड कॉम्प्युटर आणि लाइव्ह इमेज प्रोसेसिंग हे फ्लोरिडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आमची प्रणाली वापरून तयार केलेल्या ‘सर्च अँड रेस्क्‍यू ड्रोन’चे वैशिष्ट्य आहे.’’

जलदगतीने मदतकार्य शक्‍य 
माळीण गावात काही वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेच्या वेळी गावाचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे त्या ठिकाणी नेमके किती लोक अडकले आहेत, ते कोठे आहेत आणि त्यांना मदत कशाप्रकारे पोचवता येईल, याबाबतची माहिती उपलब्ध होण्यास बराच वेळ लागला. अशा परिस्थितीत ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने बाधित क्षेत्राची पाहणी झाली आणि त्याचे छायाचित्रण संबंधित अधिकाऱ्यांना उपलब्ध झाले, तर मदतकार्य जलदगतीने होऊ शकते. फ्लाइटबेसने तयार केलेल्या प्रणालीच्या आधारे ड्रोन कॅमेरा हा पूर्णतः स्वयंचलित पद्धतीने वापरला जात असल्यामुळे मानवी चुका किंवा हस्तक्षेपही होऊ शकणार नाहीत. 
 

फ्लाइटबेस’ वापरणाऱ्या संस्था, कंपन्या
कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी 
हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स लिमिटेड 
आयआयटी कानपूर आणि मद्रास 
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)

आम्ही ड्रोन बनवत नाही; पण ड्रोन किंवा ‘नेक्‍स्ट-जनरेशन इंटेलिजंट ऑटोनॉमस अनमॅन्ड एरियल व्हेईकल’ बनविणाऱ्या कंपन्यांसाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केले आहे. म्हणजे, तुम्ही तुमच्या ड्रोनबरोबर संवाद साधू शकता, त्याच्याकडून माहिती मिळवू शकता आणि इंटरनेटद्वारे त्याचे नियंत्रणही करू शकता. या तंत्रज्ञानाच्या विकसनासाठी दोन वर्षांपूर्वी व्हेंचर सेंटरकडून सीड फंडिंग मिळाले आहे.
- नितीन गुप्ता, विद्यार्थी, आयआयटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com