पृथ्वीजवळ असणाऱ्या 'सरस्वती' दीर्घिका समूहाचा शोध!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

'आयुका' आणि "आयसर'मधील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश

'आयुका' आणि "आयसर'मधील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश
पुणे - पृथ्वीपासून सुमारे 4 अब्ज प्रकाशवर्षं दूर असणाऱ्या "सरस्वती' या दीर्घिकांच्या एका प्रचंड मोठ्या समूहाचा (सुपरक्‍लस्टर) शोध लावण्यात पुण्यातील "आयुका' आणि "आयसर' या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांच्या टीमला यश आले आहे. विश्वात अशा प्रकारच्या प्रचंड आकाराच्या खगोलीय रचनेचा शोध ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असून, भारतातर्फे असा शोध प्रथमच लावण्यात आला आहे.

भारतीय शास्त्रज्ञांचे पथक गेली पंधरा वर्षे या दीर्घिका समूहाविषयी माहिती मिळवीत होते. अखेरीस या समूहाचे स्थान, त्याची रचना आणि पृथ्वीपासूनचे अंतर निश्‍चित झाल्यावर हा शोध जाहीर करण्यात आला. सरस्वती या दीर्घिका समूहात एकाच वेळी हजारो दीर्घिकांच्या समावेश आहे. त्यातील कित्येक आपल्या आकाशगंगेच्या आकाराहून प्रचंड मोठ्यादेखील आहेत. रेवती नक्षत्राच्या दिशेने हा समूह स्थित आहे. "स्लोअन डिजिटल स्काय सर्वे'च्या आधारे हा शोध लावण्यात आला. आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकन अस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या "द अस्ट्रॉफीजिकल जर्नल' या मानाच्या नियतकालिकाच्या येत्या अंकात हा संशोधन प्रबंध छापून येणार आहे. आयुकाचे शास्त्रज्ञ जॉयदीप बागची हे त्याचे प्रमुख लेखक असणार आहेत.

या शोधाविषयी माहिती देताना आयसरमधील संशोधक शिशिर सांख्ययन म्हणाले, "हा एक महत्त्वाचा शोध म्हणायला हवा. विश्वाची उत्पत्ती आणि त्यासंदर्भातील विविध खगोलीय घटनांचा अभ्यास करणे यामुळे अधिक पुढच्या टप्प्यावर पोचू शकेल. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून यापुढील अनेक रहस्य उलगडू शकतील.