'जीओ'चा नवा धमाका; 1500 रूपयात स्मार्टफोन

टीम ई सकाळ
मंगळवार, 2 मे 2017

स्वस्त 4जी फोन बनविण्याच्या शर्यतीत सध्या तरी तीन कंपन्या आहेत. रिलायन्स जीओ 1500 रूपयात 4जी फोन देणार आहे. मायक्रोमॅक्सचा भारत1 फोनची किमत 1900 रूपये असेल. लाव्हा कंपनीने लाव्हा कनेक्ट एम1 नावाचा 4जी फोन बाजारात आणण्याची तयारी केली आहे. या फोनची किमत 3,599 रूपये असेल.

भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. अवघ्या पंधराशे रूपयात 4जी फोन भारतात आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. चीनमधील स्प्रेडट्रम कंपनीशी यासंदर्भात रिलायन्सचा करार झालेला आहे.

स्वस्त 4जी फोननंतर भारतातील मोबाईल क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होईल. सध्या मायक्रोमॅक्स भारत1 नावाचा स्वस्त 4जी फोन बनवित आहे. या फोनची किमत 1900 रूपये असेल, असे सांगण्यात येते. त्याहीपेक्षा चारशे रूपयांनी स्वस्त फोन रिलायन्स बाजारात आणणार आहे.

स्प्रेडट्रम कंपनी मोबाईल फोनमधील प्रोसेसर्स बनविते. या कंपनीच्या नावावर फार मोठे काम जमा नाही. मात्र, 4जी फोन अत्यंत स्वस्तात बनविण्याचा आशावाद कंपनीकडे आहे. 'आम्ही पंधराशे रूपयांत 4जी फोन उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञान बनवितो आहोत. या संकल्पनेचा प्रसार आम्ही आमच्या भागीदारांसमवेत करतो आहोत,' असे कंपनीचे भारताचे प्रमुख नीरज शर्मा यांनी 'इकॉनॉमिक टाईम्स'ला सांगितले.

रिलायन्स जीओचा प्रमुख व्यवसाय डेटा आणि बॅन्डविड्थचा आहे. स्मार्टफोन बनविणे हा काही कंपनीचा व्यवसाय नाही. मात्र, स्वस्त 4जी फोनमुळे आणखी ग्राहक रिलायन्स जीओकडे आकर्षित होतील, असा कंपनीला विश्वास आहे. स्वस्त फोन प्रामुख्याने निमशहरी आणि ग्रामीण ग्राहकांच्या सोयीसाठी असेल. निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक केवळ स्वस्त डेटासाठी नवा फोन विकत घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे, हातात असलेल्या फोनच्या डेटा स्पीडवर ते काम चालवू शकतील. त्यांना रिलायन्स जीओकडे वळवायचे असेल, तर स्वस्त 4जी फोन हाच मार्ग रिलायन्ससमोर आहे.