'बॅकअप' पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाचा!

महेश बर्दापूरकर
शुक्रवार, 16 जून 2017

संगणकावर हल्ला करून सर्व फाइल्स लॉक करणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसबद्दल गेल्या महिन्यात मोठी चर्चा होती. तुमचा सर्व डाटा लॉक करून खंडणी मागणाऱ्या या व्हायरसने तुमच्या डेटाचा बॅकअप किती गरजेचा आहे, हे अधोरेखित केले. मात्र, आपली पृथ्वीच नष्ट झाल्यास तिचा बॅकअप घेतलेला आहे का? हा भयंकर प्रश्‍न विचारल्याबद्दल तुम्हाला कदाचित राग येईल, मात्र अशनी किंवा धूमकेतूच्या धडकेने पृथ्वी नष्ट झाल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीचा बॅकअप घेण्याची योजना संशोधकांकडे तयार आहे!

"नासा'ने आपल्या सूर्यमालेत सुमारे दहा अशनी फिरत असून, त्या पृथ्वीसाठी धोकादायक असल्याचे नुकतेच म्हटले आहे. त्यांच्यापासून पृथ्वीला नक्की किती धोका पोचेल याबद्दल स्पष्ट नसले, तरी पूर्वी अशाप्रकारच्या अशनी पृथ्वीवर धडकून मोठी हानी झाल्याच्या नोंदी आहेत. पृथ्वीवर 6 कोटी वर्षांपूर्वी धडकलेल्या एका अशनी किंवा धूमकेतूमुळेच डायनोसॉर नष्ट झाले होते. या अशनी अनेकदा पूर्वसूचना न देता पृथ्वीजवळून वेगाने निघून जातात. याच वर्षी दोन अशनी पृथ्वीपासून 15 हजार किलोमीटर अंतरावरून गेल्या असून, हे अंतर खूपच कमी होते. या "अस्मानी' संकटांबरोबरच मानवी चुकांमुळेही पृथ्वी नष्ट होऊ शकते. प्राणी, पक्षी, वनस्पती नष्ट होण्याच्या घटनांत पृथ्वीच्या निर्मितीनंतर एक हजार पट वाढल्या आहेत. या परिस्थितीत पृथ्वी नष्ट झाल्यास तिची पुनर्उभारणी करण्यासाठी, जीवसृष्टी बहरण्यासाठी काय करावे लागेल?

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा बॅकअप घेण्यासाठी संशोधक 1970पासूनच प्रयत्न करीत असून, जगभरात अनेक ठिकाणी बियांच्या बॅंका उभारण्यात आल्या आहेत. उत्तर ध्रुवावरील बर्फाच्छादित भागातील खडकांच्या पोटात या बिया ठेवण्याचा प्रयोग झाला आहे. मात्र, वैश्‍विक तापमानवाढीमुळे तेथील बर्फ वितळून बिया खराब होण्याचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी गोठवलेली प्राणिसंग्रहालयेही उभारली असून, तेथे प्राण्यांची अंडी, वीर्य आणि डीएनएही साठविण्यात आले आहेत. मात्र, या सर्व प्रकारच्या साठवणीला मर्यादा आहेत.

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा बॅकअप पृथ्वीवरच घेणे व्यवहार्य नसून, बॅकअप अवकाशामध्ये घेतल्यासच त्याचा उपयोग होईल. त्यादृष्टीने संशोधकांचे प्रयोग सुरू आहेत. बिया सहा महिन्यांसाठी अवकाशामध्ये ठेवून त्या पुन्हा पृथ्वीवर रुजतात का, याचेही प्रयोग झाले आहेत. अवकाशामधील किरणोत्सर्गामुळे पेशींमधील डीएनए नष्ट होतात व त्यामुळे जैविक वस्तूंचा टिकाव लागत नाही. या बिया पृथ्वीच्या गुरुत्व कक्षेमध्ये साठविल्यास किरणोत्सर्गाचा धोका तुलनेने कमी आहे. या भागात जैविक वस्तूंचा साठा केला, तरी पृथ्वी नष्ट झाल्यास त्या पुन्हा कशा आणायचा हा प्रश्‍नही आहेच. याचे उत्तर रोबोटिक्‍समध्ये दडले असून, अवकाशातील रोबो विशिष्ट परिस्थितीत या जैविक वस्तू पुन्हा पृथ्वीवर आणू शकतील. (रोबोंचा एक गट नष्ट झालेल्या पृथ्वीवर पुन्हा जीवसृष्टी बहाल करण्यासाठी प्रयत्न करतो, हे कथानक हॉलिवूडपटामध्ये नक्की शोभेल!) ही जैविक माहिती साठविण्यासाठी चंद्र व आपल्या आकाशगंगेमधील इतर चंद्रांचाही उपयोग करण्याचा विचार संशोधक करीत आहेत. खोल अवकाशात फिरणाऱ्या एखाद्या उपग्रहावरही ही माहिती साठवता येईल. यासाठीच्या प्रकल्पांची आखणी झाली असून, जगभरातील विविध गट त्याची तयारी करीत आहेत.

थोडक्‍यात, "मानव व्हर्जन 1.0' नष्ट झाल्यास त्याच्या 2.0 आवृत्तीसाठीची तयारी प्रगतिपथावर आहे!