जीवशास्त्राच्या वर्गाचा विश्‍वविक्रम

India International Science Festival
India International Science Festival

चेन्नई ; जीवाणू आणि विषाणूच्या संसर्गात फरक काय? कुष्ठरोग संसर्गजन्य आहे का? केसांमध्ये होणाऱ्या कोंड्यामुळे आरोग्याला धोका आहे का? म्युटेशन कशाला म्हणायचे? केमोथेरपी म्हणजे म्युटेशन आहे का? अशा अनेक प्रश्‍नांची सरबत्ती आणि त्यांना दिलेली योग्य उत्तरे याद्वारे जीवशास्त्राचा सर्वांत मोठ्या वर्गातील तास रंगत गेला आणि अखेरीस एका विश्‍वक्रमाची नोंद भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सवात आज करण्यात आली. "गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड'नेही या विक्रमाला मान्यता दिली. 

एकाचवेळी हजारहून अधिक विद्यार्थ्यांना जीवशास्त्राचा धडा शिकविण्याचा विश्‍वविक्रम चेन्नईमध्ये सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सवात (आयआयएसएफ) आज नोंदविण्यात आला. विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान सोप्या भाषेत पोचविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकाच वेळी सर्वाधिक विद्यार्थ्यांना जीवशास्त्राचा धडा शिकवून त्याची नोंद "गिनिज' बुकमध्ये करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. "पेशींचा अभ्यास ते डीएनए विलगीकरण' या विषयावर चेन्नईतील श्री शंकरा सिनियर सेकंडरी स्कूलमधील अध्यापिका एम. लक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विश्‍वविक्रम होण्यासाठी केवळ अर्ध्या तासाच्या वर्गाची आवश्‍यकता होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे हा वर्ग सुमारे दीड तास रंगला. 

दोन महिने तयारी 
विक्रमानंतर "सकाळ'शी बोलताना एम. लक्ष्मी म्हणाल्या, ""ऑगस्टपासून याची तयारी सुरू होती. मी गेली दहा वर्षे शिक्षक म्हणून काम करत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर बोलण्याचा विश्‍वास होता. बोलण्यासाठी मी तीन विषय निवडले होते. त्यापैकी पेशीविज्ञानाचा विषय अंतिम करण्यात आला. विक्रम झाल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटते.'' 

असा झाला विक्रम 
जीवशास्त्राचा सर्वांत मोठा वर्ग घेण्याचा विक्रम करण्यासाठी किमान 500 मुलांना एकत्रितपणे शिकवणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात 20 शाळांमधील 1049 मुले यात सहभागी झाली. किमान तीस मिनिटांचे शिकवणे गरजेचे होते. तसेच, मुलांचा सहभागही महत्त्वाचा होता. प्रत्येकी 50 विद्यार्थ्यांच्या गटावर लक्ष ठेवण्यासाठी एक निरीक्षकही नियुक्त करण्यात आले होते. विज्ञानभारतीचे सरचिटणीस एस. जयकुमार आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्ष वर्धन यांनी विक्रमाची नोंद केलेले प्रशस्तिपत्रक स्वीकारले.

प्रदूषणमुक्त फटाक्‍यांचा आग्रह 
"प्रदूषणमुक्त फटाक्‍यांच्या निर्मितीचे आपल्यासमोर आव्हान आहे. शास्त्रज्ञांनी यासाठी पुढाकार घ्यावा व उद्योगांनीही त्यांना साथ द्यावी,'' असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या फटाकाबंदीच्या निर्णयानंतर देशात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ""फटाक्‍यांच्या प्रदूषणाचा, त्याचा आवाजाचा त्रास होतो. उत्सव आनंदाने साजरे करताना अशा प्रकारच्या समस्यांवर मात करायला हवी. यासाठी प्रदूषणमुक्त फटाक्‍यांचा विकास करण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे. फटाकाबंदीच्या निर्णयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com