समुद्राचे पाणी होणार पिण्यायोग्य 

scientists make sea water drinkable
scientists make sea water drinkable

भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याचे नवे संशोधन 
न्यूयॉर्क : समुद्राचे खारे पाणी पिण्यास लायक नसल्याने अनेक ठिकाणी पाणी असून टंचाई भासत असते; पण यावरही उपाय शोधून काढण्यात एका भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याला यश आल्याचे सांगण्यात आले. चैतन्य करमचेदू हा पोर्टलॅंडमधील ओरेगॉनमधील रहिवासी आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे रूपांतर पिण्यासाठी गोड्या पाण्यात करणे व तेही माफक खर्चात, याविषयी चैतन्यने विज्ञान प्रयोग केला आहे. त्याला यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. विज्ञान अन्‌ तंत्रज्ञान जगतात याची सध्या चर्चा सुरू आहे. 
जगातील अनेक भागात पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. पृथ्वीचा दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला असल्याने समुद्र हा पाणी मिळविण्याचा सर्वांत मोठा स्त्रोत आहे, असा विश्‍वास चैतन्य व्यक्त करतो; पण समुद्राचे पाणी खारट असल्याने ते पिण्यासाठी अयोग्य असते, ही मोठी अडचण आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी व समुद्राचे पाणी पिण्यासाठी योग्य करण्यास स्वस्त दरातील तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न जगभरात शास्त्रज्ञ करीत असले तरी अद्याप त्यांना यश आलेले नाही. 
सागराच्या पाण्यातून मीठ बाजूला काढण्याची प्रक्रिया यासाठी उपयुक्त असली तरी, बहुतेक ठिकाणी ती करणे शक्‍य नसते. यावर विचार करताना शाळेतील प्रयोगशाळेत काम करण्यास सुरवात केली. समुद्रातील पाण्यात मीठ संपृक्त अवस्थेत नसते, हे लक्षात घेऊन चैतन्यने शोषक असलेल्या पॉलिमरवर संशोधन करून पाण्यातून मीठ वेगळे करणारी कमी खर्चातील पद्धत शोधून काढली. याविषयी जगभरातील शास्त्रज्ञ जी पद्धत वापरीत होते, बरोबर त्याच्या उलट विचार करून चैतन्यने नवे संशोधन केले. मिठाशी संबंधित 10 टक्के पाण्यातील रेणूंवर अन्य संशोधक काम करीत होते; तर चैतन्यने 90 टक्के पाण्यावर संशोधन केले. यातून त्याला मिळालेले यश हे विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, नागरिकांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. चैतन्यचे नवे तंत्रज्ञान खर्चिक नसून, ते सर्वत्र उपलब्ध होऊ शकत असल्याने ज्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी सहज उपलब्ध होत नाही, त्यांच्यासाठी हा नवा प्रयोग वरदान ठरणार आहे. 


विजेचा वापरही कमी 
समुद्रातील पाण्यापासून मीठ वेगळे करून त्याचा पिण्यासाठी वापर करण्याची पद्धत सध्या अस्तित्वात आहे; पण एका कुटुंबासाठी या पद्धतीसाठी लाखो रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच यात विजेचा वापरही मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. चैतन्य करमचेदीच्या "पॉलिमर' पद्धतीत खर्चाचे प्रमाण नगण्य असून, विजेचा वापरही कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 


अमेरिकेचा पुरस्कार 
या संशोधनाला पाठबळ देण्यासाठी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय जागतिक विकास विभागाने चैतन्यला दहा हजार डॉलरचा पुरस्कार दिला आहे. "एमआयटी'च्या तंत्रज्ञान परिषदेत त्याला या प्रयोगासाठी दुसरे पारितोषिक मिळाले. अमेरिकेतील उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या विज्ञान बुद्धिमत्ता शोध चाचणीच्या उपांत्य फेरीत तो पोचला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com