'संवेदनशील त्वचे'मुळे अवकाशयान राहणार सुरक्षित

पीटीआय
बुधवार, 29 मार्च 2017

'नासा'च्या शास्त्रज्ञांनी संभाव्य धोका ओळखणारी आणि यानाला धडक बसली तर त्यावर उपाय सुचविणारी यंत्रणा विकसित केली.

वॉशिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी अवकाशयानांच्या सुरक्षिततेसाठी 'संवेदनशील त्वचे'ची निर्मिती केली आहे. यामुळे अवकाशयानामध्ये होणारा अथवा होण्याची शक्‍यता असलेला बिघाड पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाला तत्काळ लक्षात येऊन उपाय करता येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे भविष्यामध्ये उपग्रहांबरोबरच विमाने आणि पर्यावरणाचेही रक्षण करणे शक्‍य आहे.

अत्यंत पातळ थरामध्ये विविध तंत्रज्ञानाचे एक सर्किट बसवून ही 'संवेदनशील त्वचा' तयार करण्यात आली आहे. हे सर्किट अवकाशयानाच्या रचनेत अंतर्भूत करता येऊ शकते, असे 'नासा'ने सांगितले आहे. अवकाशात फिरणाऱ्या छोट्या आकाराच्या अशनी आणि अवकाशातील कचऱ्यामुळे अत्यंत वेगाने भ्रमण करणाऱ्या अवकाशयानाला धोका निर्माण होऊ शकतो. या वेगामुळे अत्यंत छोट्या वस्तूंपासूनही मोठे नुकसान होऊ शकते. या समस्येवर उपाय म्हणून 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी संभाव्य धोका ओळखणारी आणि यानाला धडक बसली तर त्यावर उपाय सुचविणारी यंत्रणा विकसित केली.

धडक बसली असल्यास अवकाशयानाचे किती प्रमाणात नुकसान झाले, हे समजू शकते. सध्याच्या परिस्थितीत अवकाशयानाच्या बाहेरील आवरणाच्या दोन ते तीन थरांपर्यंत नुकसान झाले असले तरी ते समजून येत नाही. त्यामुळे पुढील काही काळात त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच अवकाशयान गतिमान असताना नक्की कोठे नुकसान झाले आहे, ते समजणे अत्यंत अवघड असते. त्यामुळेच अत्यंत कमी क्षमतेचे इलेक्‍ट्रिक सर्किट थर्मल इन्सुलेशन पट्टीवर बसवून आणि त्यामधील सॉफ्टवेअरच्या साह्याने ही त्रुटी दूर करता येणे शक्‍य आहे.

Web Title: sensitive skin will save spacecraft