कच्छच्या रणात सापडला "मासा सरडा'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

ज्युरासिक इचिथोसोरचा सांगाडा भारतात प्रथम सापडला ही केवळ महत्त्वाची बाब नसून यातून या प्राण्याची उत्क्रांती आणि त्याच्या वंशातील वैविध्यावर प्रकाश पडला आहे. गोंडवनभाग आणि भारताच्या अन्य खंडांतील ज्युरासिकशी असलेला जैविक संबंध यामुळे समोर येणार आहे.
 

बर्लिन/नवी दिल्ली - डायनासोरबरोबर अस्तित्वात असलेल्या ज्युरासिक इचिथोसोर या प्राण्याच्या हाडाचा पूर्ण सांगाडा भारतात सापडला आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात या सरपटणाऱ्या सागरी प्राण्याचा सांगाडा सापडला असून, या प्राण्याला ग्रीक भाषेत मासा सरडा असे संबोधण्यात येते.

दिल्ली विद्यापीठ आणि जर्मनीतील "युनिव्हर्सिटी ऑफ एर्लांगेन-न्यूरेम्बर्ग'मधील संशोधकांनी हा सांगाडा शोधला आहे. भारतात प्रथमच ज्युरासिक इचिथोसोरचा सांगाडा सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या प्राण्याचा सांगाडा याआधी उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये सापडला होता. दक्षिण गोलार्धात दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये या प्राण्याचे सांगाडे सापडले होते. कच्छच्या रणात सापडलेला सांगाडा 5.5 मीटर लांबीचा आहे. हा प्राणी ऑप्थॅल्मोसोरिडे या वंशातील असून, तो पृथ्वीवर सुमारे 16.5 कोटी अथवा 9 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असावा, असा अंदाज आहे. हा प्राणी शिकारी करणारा असावा, असे त्याच्या सांगाड्यावरून स्पष्ट होत आहे.

हे संशोधन "प्लॉस वन' या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. य संशोधनामुळे ज्युरासिक या प्रजातीचे अनेक सांगाडे विभागात सापडण्याची शक्‍यता निर्माण झाले आहे. या सरपटणाऱ्या सागरी प्राण्याची उत्क्रांती प्रक्रिया स्पष्ट होण्यासही यामुळे भविष्यात मदत होणार आहे.

प्राण्याच्या उत्क्रांतीवर प्रकाश पडणार
दिल्ली विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील गुंटुपल्ली प्रसाद म्हणाले, की ज्युरासिक इचिथोसोरचा सांगाडा भारतात प्रथम सापडला ही केवळ महत्त्वाची बाब नसून यातून या प्राण्याची उत्क्रांती आणि त्याच्या वंशातील वैविध्यावर प्रकाश पडला आहे. गोंडवनभाग आणि भारताच्या अन्य खंडांतील ज्युरासिकशी असलेला जैविक संबंध यामुळे समोर येणार आहे.