लिंक्‍डइन- तुमची ऑनलाईन ओळख 

linkedin profile
linkedin profile

असं म्हटलं जातं की, कष्ट, मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर माणसाला यशस्वी होता येतं; पण माहिती युगात या मूल्यांच्या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणची तुमची उपस्थिती आणि योग्य ओळखी; तर या ओळखी म्हणजे फक्त कौटुंबिक, सामाजिक ओळखी नाहीत तर तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, यशस्वी व्यक्ती यांच्या ओळखी. तुमचं ऑनलाईन अस्तित्व योग्य लोकांना दिसावं आणि त्याचा तुम्हाला प्रोफेशनली फायदा व्हावा, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही "लिंक्‍डइन'वर असायलाच हवं. जरी आजकाल रिक्रुटर्स सर्व उमेदवारांचे प्रोफाईल आणि ऑनलाईन अस्तित्व तपासून पाहत असले तरीही फक्त दुसरा जॉब मिळवणे हे लिंक्‍डइन वापरण्याचं एकमेव कारण असू नये. तुमच्याबद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल, कौशल्यांबद्दल जगाला माहिती मिळावी यासाठी खरं म्हणजे लिंक्‍डइन वापरावं. 

ऑनलाईन रिझ्युम अशी एका शब्दातील ओळख या टूलसाठी खूपच तोकडी आहे. साधारणपणे 33 कोटी लोक जगभरातून या संकेतस्थळावर आपला संपर्क वाढवण्यासाठी येत असतात. आपल्यासारख्या किंवा समविचारी लोकांची गाठभेट घडणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवल्यास लिंक्‍डइनची शक्ती तुम्ही अनुभवू शकाल. 

लिंक्‍डइन प्रोफाईल कसं असावं? 

प्रोफाईल समरी : तुमची एका वाक्‍यात ओळख करून देणारा भाग म्हणजे समरी. यात तुमचे नाव यायला हवे आणि तुम्ही कुठल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहात ते इथे लिहायला हवे. सध्या कार्यरत असलेल्या प्रोजेक्‍ट किंवा कामाचा उल्लेख असणे उत्तम. हा भाग तुमच्या नावासह गुगल सर्चमध्ये येतो; त्यामुळे लिंक्‍डइन न वापरणाऱ्यांनासुद्धा तुम्ही सापडू शकता. 

एक्‍सपिरियन्स : एक्‍सपिरियन्स लिहिताना प्रत्येक रोलसमोर त्या कंपनीसोबत असताना तुम्ही पार पाडलेली महत्त्वाची कामे, प्रोजेक्‍ट्‌स याची लिस्ट लिहावी. परिच्छेद लिहिणे टाळावे. 

रेकमेंडेशन : हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्यांनी तुमच्यासोबत काम केलेले आहे किंवा तुमच्या कंपनी/संस्थेतर्फे तुम्ही त्यांच्याशी व्यवहार केलेले आहेत, अशांनी तुमच्याविषयी लिहिलेले कौतुकाचे शब्द म्हणजे रेकमेंडेशन; तर या रेकमेंडेशनची गंमत अशी आहे की ज्यांनी ते लिहिलेलं आहे त्यांचं सध्याचं डेसिग्नेशन (पद) त्या रेकमेंडेशनखाली दिसतात. उदा. असोसिएट असताना तुमच्या एखाद्या मित्राने तुमच्यासाठी रेकमेंडेशन लिहिलं आणि आजच्या घडीला तो मित्र डायरेक्‍टर पदावर पोचलेला असेल तर त्याने लिहिलेल्या रेकमेंडेशनखाली त्या मित्राचं आजचं पद डायरेक्‍टर लिहिलेलं असेल. ज्यामुळे त्या रेकमेंडेशनची विश्‍वासार्हता वाढते आणि तुमचीही. 

स्किल्स : तुमची कौशल्ये लिहा. जी कौशल्ये तुम्ही इथे लिहाल ती तुमच्या सर्व लिंक्‍डईन कनेक्‍शनला दिसतील आणि त्यांना तुमच्यातील कौशल्यांना एन्डॉर्स (पाठिंबा) करता येईल. 

व्हॉलेंटिअर एक्‍स्पिरिअन्स आणि कॉज : तुम्ही तुमच्या प्रोफेशनल जीवनाव्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टींमध्ये रस घेता किंवा स्वयंसेवक आहात किंवा कुठले उपक्रम चालवता हे इथे लिहा. जरी खूप जास्त महत्त्व दिलं जात नसलं तरीही यातून तुम्हाला समविचारी मंडळींशी पटकन जुळवून घेता येतं. लिंक्‍डइन पल्स या ठिकाणी तुम्ही लेख लिहू शकता आणि ते तुमच्या प्रोफाईलवर सदैव दिसतात. त्याने तुमचा अनुभव आणि अभ्यास तुम्ही प्रदर्शित करू शकता. 

स्लाईड शेअर हे लिंक्‍डइनचं एक वैशिष्ट्य आहे जिथे तुम्ही तुमची प्रेझेंटेशन साठवू शकता आणि सर्वांना उपलब्ध करून देऊ शकता. आठवड्यातून 15 ते 20 मिनिटे लिंक्‍डइनसाठी ठेवलीत तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील चालू घडामोडी आणि अपेक्षित बदल नक्कीच कळतील. इथे स्वतःला अपडेट ठेवणारी मंडळी यशस्वी होण्याचे प्रमाण आणि शक्‍यता नेहमीच जास्त असते. मग... चला भेटूयात लिंक्‍डइनवर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com