तंत्रज्ञानाची काठी अंधांच्या हाती 

राहुल वेलापुरे
बुधवार, 4 जानेवारी 2017

सामाजिक प्रसारमाध्यमं आणि तंत्रज्ञान मुळातच सामान्यांना जगाकडे पाहण्यासाठी वेगळी दृष्टी आणि वेगळं वळण देणारं समाजोपयोगी माध्यम. तरुणाई या माध्यमांना आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिकतेसाठी भन्नाट वेगाने आत्मसात करताना आपण पाहतो आहोतच. परंतु या माध्यमांचा आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करताना आपण समाजातल्या अशा वर्गाला आपल्यासोबत सामावून घेऊ शकतो, ज्यांच्या आयुष्यात दृष्टीहीनतेने आव्हाने उभी केली आहेत. सर्वांना सोबत घेऊन प्रगती करण्याची जाणीव ठेवून या क्षेत्रातही आता आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत.

सामाजिक प्रसारमाध्यमं आणि तंत्रज्ञान मुळातच सामान्यांना जगाकडे पाहण्यासाठी वेगळी दृष्टी आणि वेगळं वळण देणारं समाजोपयोगी माध्यम. तरुणाई या माध्यमांना आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिकतेसाठी भन्नाट वेगाने आत्मसात करताना आपण पाहतो आहोतच. परंतु या माध्यमांचा आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करताना आपण समाजातल्या अशा वर्गाला आपल्यासोबत सामावून घेऊ शकतो, ज्यांच्या आयुष्यात दृष्टीहीनतेने आव्हाने उभी केली आहेत. सर्वांना सोबत घेऊन प्रगती करण्याची जाणीव ठेवून या क्षेत्रातही आता आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. जागतिक ब्रेल दिनाच्या निमित्ताने अशा वर्गासाठी सरकारी कार्यालयापासून व्यावसायि कांपर्यं त सर्वच जण आपल्या परीने योगदान देताना दिसताहेत... 

आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिऍलिटी) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता जशी जशी अद्ययावत होत जातेय, तसे तसे दृष्टिहीन मंडळींना कृत्रिम दृष्टी देण्याच्या कार्याला मूर्तिमंत रूप मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या सोबतीने आता दृष्टिहीन मंडळी लवकरच आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याच वेगाने प्रगती करताना बघणे, हा एक आनंददायी क्षण असेल. 

गुगलचे अँड्रॉईड आणि ऍप्पल आयफोन स्मार्ट फोनमध्ये याआधीपासूनच "टॉकबॅक' नावाची सुविधा अस्तित्वात आहे, जी सुरू करताच दृष्टिहीन व्यक्तींकरिता भ्रमणध्वनीसंच हा एक वापराबद्दल मार्गदर्शक ठरतो. याआधीही ब्रेललिपी, ब्रेल टायपिंग आणि प्रिंटिंग आणि ऑडीओ-बुक्‍स (OCR) दृष्टिहीनांच्या आयुष्यात बदल घडवत असताना, तंत्रज्ञान आता आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने याच क्षेत्रात पुढचे पाउल टाकू पाहतेय. 

व्हॉईस (vOICe) - हे तंत्रज्ञान हेडसेट (किंवा एक असा चष्मा ज्याला कॅमेरा आहे) आणि बोन कंडक्‍टिंग हेड फोन्स (कंपनातून ध्वनिनिर्मिती करणे) यांच्या आधारे काम करते. हेडसेटवर असलेला कॅमेरा घेत असलेल्या सभोवतालच्या छायाचित्रांना डिकोड करून त्या पासून ध्वनिलहरींची निर्मिती केली जाते. या ध्वनिलहरी बोन कंडक्‍टिंग हेड फोन्समार्फत पाठवले गेलेले संकेत यांच्या आधारे व्यक्तीला सभोवतालच्या वातावरणाला समजून घेण्यास मदत होते. 

Cities Unlocked - (मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञान) 
तंत्रज्ञानातल्या दिग्गज मायक्रोसॉफ्टने देखील यात सहभागी होत एक असं तंत्रज्ञान विकसित करत आहे. या तंत्रज्ञानात जीपीएस ऍप आणि हेडसेटच्या साह्याने आता इतरत्र फिरणे सहज शक्‍य होणार आहे. 

ऑरकॅम (Orcam) : ऑरकॅम एक कॅमेरा असून जो चष्म्यावर लावला जातो आणि कॅमेऱ्याच्या साह्याने आपल्याला शब्द, रस्त्यावरील दिशादर्शक फलक, वाटेमध्ये येणाऱ्या वस्तू आणि व्यक्ती यांचे फोटो काढून त्यांना वाचून दाखवत ओळखण्यास मदत करतो. 

ब्रेल ई-बुक रीडर - (ऍमेझॉन किन्डल) : ऍमेझॉनने दृष्टिहीनांसाठी किन्डल ब्रेल ई-बुक रीडर आणला आहे. ज्यात ई-पुस्तकांना ब्रेल भाषेमध्ये रूपांतरित करून पुस्तक वाचण्यास मदत करते. हे किन्डल ई-पुस्तक तंत्रज्ञान ऍमेझॉनवर अंदाजे नऊ हजार रुपयांना उपलब्ध आहे. 

प्लास्टिक ब्रेन (Plastic brain) : यात न्युरोसायकॉलॉजी आणि तंत्रज्ञानाचा मिलाप केलेला आहे. यामध्ये जिभेवर एक सेन्सर ठेवला जातो. त्या सेन्सरला डोळ्यावर असलेल्या हेडसेट कॅमेऱ्याच्या आधारे संदेश पाठवले जातात आणि त्या कॅमेऱ्याने घेतलेल्या चलचित्रांना अतिशय जलद गतीने डिकोड करून योग्य ती स्पंदन निर्मिती केली जाते आणि जीभेद्वारे ती स्पंदनं मेंदूकडे पाठवून त्यात दृश्‍यनिर्मिती केली जाते. या तंत्रज्ञानाच्या आधारे सभोवतालच्या घटना अनुभवणे आता शक्‍य झालेले आहे.