गिर्यारोहण करताना... काळजी हीच गुरुकिल्ली

राज्यातील विविध गड किल्ले असो किंवा सह्याद्रीतील उंच शिखर. येथे साहसी पर्यटन व गिर्यारोहणासाठी तरुणांमध्ये कल वाढत आहे.
Mountaineering
MountaineeringSakal
Summary

राज्यातील विविध गड किल्ले असो किंवा सह्याद्रीतील उंच शिखर. येथे साहसी पर्यटन व गिर्यारोहणासाठी तरुणांमध्ये कल वाढत आहे.

राज्यातील विविध गड किल्ले असो किंवा सह्याद्रीतील उंच शिखर. येथे साहसी पर्यटन व गिर्यारोहणासाठी तरुणांमध्ये कल वाढत आहे. काही तरी ॲडव्हेंचरस करण्याची इच्छा असल्यामुळे अशा साहसी पर्यटनाला निवडण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी लागणारे कौशल्य, प्रशिक्षण आणि अनुभव याचा विचार बरीच तरुण मंडळी करत नाही, तर काही संस्थांनी साहसी पर्यटनाला व्यावसायिक स्वरूप दिले असून, खुद्द आयोजकांनाच याच्या तांत्रिक गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे अशा साहसी पर्यटनादरम्यान अपघात होतात आणि त्यात त्यांना जीव गमवावा लागतो. नुकतेच नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड जवळील हडबीची शेंडी या सुळक्यावर गिर्यारोहकांच्या पथकाचा झालेल्या अपघातात तांत्रिक पथकातील दोघेजण दगावले आणि एक गिर्यारोहक गंभीररीत्या जखमी झाला.

सोशल मीडियावरील ॲडव्हेंचरस जाहिराती

ॲडव्हेंचर ट्यूरिझम मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. अनेकांना काहीतरी वेगळं, धाडसी पर्यटन करायचे असते, त्यामुळे ते अशा पर्यटनाकडे वळतात. पूर्वी अशा प्रकारच्या पर्यटनामध्ये लोकांना केवळ ट्रेकिंगसाठी घेऊन जात होते. मात्र, आता लोकांना काहीतरी नावीन्य पाहिजे आणि या नावीन्यातून व्यवसाय निर्माण होत असल्याने कमर्शिअल ग्रुपतर्फे सोशल मीडियावर अशा ॲडव्हेंचरस ट्यूरिझमच्या जाहिराती टाकण्यात येतात. यात होणारी आर्थिक उलाढाल ही प्रचंड मोठी आहे. लोकं कुठलीही विश्‍वासार्हता न तपासता अनेकवेळा केवळ सोशल मीडियावर येणाऱ्या जाहिरातींमधून सहभागी होतात. यावेळी आयोजकांची कोणतीही गुणवत्ता तपासली जात नाही. त्यात अनेकजण केवळ फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाईक्स वाढविण्यासाठी अशा मोहिमांमध्ये सहभागी होताना दिसत आहे.

मुळात सह्याद्रीमधील सुळक्यांचा खडक ठिसूळ असतो, काही प्रमाणात त्यात मातीचे आणि झाडांचे प्रमाण कमी असते, पूर्वी खूप कमी प्रमाणात संस्थेचे मेंबर क्लाइंबिंग करायचे आणि वर्षभरात जास्तीजास्त २५ क्लायंबर क्लाइंबिंग करायचे आणि आता एका आठवड्यात किमान ५०-१०० लोक क्लाइंबिंग करतात. त्यामुळे संपूर्ण सीझन किमान ५०० पर्यटक क्लाइंबिंग करतात. परिणामी, मातीची आणि दगडाची झीज होते याचा विचार करणे गरजेचे आहे. आताच सह्याद्रीमध्ये सुळक्यांवर कमर्शिअल क्लाइंबिंगला बंद केले पाहिजे तरच हे सुळके भविष्यात राहतील आणि पुढच्या पिढीलाही ते बघायला आणि क्लाइंबिंग करायला मिळतील, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

प्रशिक्षण व सराव महत्त्वाचाच...

गिर्यारोहण हा धाडसी क्रिया प्रकार आहे. यामध्ये रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग, पर्वतारोहण आदींचा समावेश आहे. यात रॉक क्लाइंबिंग हा प्रकार करताना याचे तांत्रिक प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. केवळ प्रशिक्षण नाही, तर त्याचा सराव करणे आणि त्यासाठी शारीरिकरित्या स्वतःला तयार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. रॉक क्लाइंबिंग करताना व्यक्ती एका विशिष्ट उंचीवर असते. उंच शिखरावर हे साहसी क्रिया करताना त्यासाठी वापरलेली उपकरणे व्यवस्थित आहेत का, ज्या सुळक्यांची दगडे ढासळत आहेत का, अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हा अनुभव केवळ योग्य प्रशिक्षण आणि सरावातून मिळतो. त्यामुळे नैसर्गिक अपघातातील हानी कमी करणे आणि मानवी चुकांमधून होणारे अपघात टाळले जाऊ शकते, असे गार्डीयन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंगचे (जीजीआयएम) गिर्यारोहण प्रशिक्षक भूषण हर्षे यांनी सांगितले.

पर्वतरांगांमध्ये मदतीसाठी

जीजीआयएमच्या वतीने २०१६ मध्ये ‘महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटर’ (एमएमआरसीसी) या हेल्पलाइनची सुरुवात केली होती. डोंगराळ व दुर्गम भागातील आपत्कालीन मदतीसाठी ही सुविधा २४ तास सुरू असून, यामध्ये अनेक गिर्यारोहण संस्था आणि गिर्यारोहकांकडून सेवा पुरविण्यात येते. साहसी पर्यटनादरम्यान मदतीसाठी नागरिक ७६२०२३०२३१ या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

ट्रेकिंग स्पॉट

पुणे विभाग

  • लोणावळा

  • खंडाळा

  • ढाक बहिरी गड

  • ताम्हिणी

  • रॅपलिंगसाठी ड्युक्स नोज

  • तैलबैला

  • राजगड

  • तोरणा

  • जीवधन किल्ला

  • खडा पारशी

नगर

  • हरिश्र्चंद्रगड

  • भैरव गड

नाशिक

  • रतनगड

  • कळसूबाई

  • सांधण दरी

  • मदनगड

  • अलंग गड

  • हरिहर किल्ला

  • रामशेज किल्ला

रॉक क्लाइंबिंग करताना घ्यावयाची काळजी व आवश्यक पूर्वतयारी

  • रॉक क्लाइंबिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण अनिवार्य

  • हेल्मेट पूर्णवेळ परिधान करणे आवश्‍यक

  • साहित्य उदा. रोप्स, अँकर्स, हार्नेस हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त व उच्च दर्जाचे असावेत

  • साहित्यांची वेळोवेळी तपासणी आवश्यक, खराब झाल्यास ताबडतोब बदल करणे

  • या साहसी पर्यटनात सहभागी होणारे लीड क्लायंबर, बिलेयर यांच्याकडे तंत्रशुद्ध प्रशिक्षण गरजेचे

  • रॉक क्लाइंबिंगचा पुरेसा अनुभव अतिआवश्यक

  • दुसऱ्या ग्रुपला रॉक क्लाइंबिंगसाठी घेऊन जाताना सुरक्षिततेची संपूर्ण पूर्वतयारी अनिवार्य

  • कुशल मनुष्यबळ सोबत असणे अतिशय गरजेचे

  • आपत्कालीन वेळेत योग्य सुविधांची पूर्वतयारी

  • रॉक क्लाइंबिंग उपक्रमाची सर्वंकष तयारी मार्गदर्शकांच्या निरीक्षणामध्ये करणे

हडबीची शेंडी येथे घडलेली घटना अतिशय क्लेशदायक आहे. साहसी उपक्रम करताना सहभागी व्यक्तींचा मृत्यू होणे, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेमागची कारणे काय आहेत, याची सविस्तर माहिती आम्ही घेत आहोत. रॉक क्लाइंबिंगसारखे अतिशय तांत्रिक साहसी उपक्रम करताना सहभागी व्यक्तींचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण, पुरेसा सराव व आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त उपकरणांचा वापर ‘मस्ट’ आहे. तसेच, इतर व्यक्तींना घेऊन यासारखे साहसी पर्यटन उपक्रम राबवताना सुरक्षिततेची सर्वंकष काळजी घेणे अनिवार्य आहे, असे दुर्दैवी अपघात टाळण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ गिर्यारोहणातील शिखर संस्थेच्या नात्याने मार्गदर्शक नियमावली तयार करत असून, या नियमावलीची अंमलबजावणी करूनच साहसी उपक्रम व साहसी पर्यटन उपक्रम आयोजित करावे, जेणेकरून असे अपघात टाळता येऊ शकतील.

- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

साहसी पर्यटनासाठी लोकांना असलेली आवड चुकीची नाही. मात्र, कमर्शिअल ग्रुप्सद्वारे आयोजित अशा प्रकारच्या पर्यटनात सहभाग घेताना त्या ग्रुपमध्ये असलेले लीडर यांचा अनुभव, प्रशिक्षण झाले आहे की नाही?, सुरक्षिततेच्या उपाययोजना, मनुष्यबळ हे सर्व सुनिश्‍चित करणे प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. तसेच, आयोजकांनी देखील याची खबरदारी घेतली पाहिजे. हडबीची शेंडी येथे झालेल्या अपघातातही पाहिले तर सहभागी सुखरूप खाली उतरले. मात्र, मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुखांचाच त्यात अपघात झाला. त्यामुळे त्यांना तांत्रिकबाबींचा खरच अभ्यास होता की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.

- संतोष जगताप, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स प्रशिक्षक, भोंसला ॲडव्हेंचर फाउंडेशन (नाशिक)

अशा प्रकारच्या मोहिमांचे आयोजन करताना इतरांची सुरक्षितता हे प्राधान्य असायला हवे. सुरक्षेचा भाग म्हणून माऊंटेनियरिंगमध्ये उपकरणे हे नेहमी अप टू डेट असावे. बऱ्याचवेळी अशा मोहिमांमध्ये बचाव कार्य केले आहे. रॉक क्लाइंबिंगच माहिती नसताना केवळ नविन काही तरी करायचे म्हणून तरुण मुलंमुली हे करताना अनेकदा या बचाव कार्यादरम्यान आढळून आले.

- पद्माकर गायकवाड, मुख्य समन्वयक, रेस्क्यू कॉर्डिनेशन कमिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com