मिर्झिया: नाशिकच्या संयमीची बॉलिवूडमध्ये एंट्री

Saiyami Kher
Saiyami Kher

नाशिक- प्रेम... अडीच अक्षरी शब्द, पण याच प्रेमासाठी गरीब-श्रीमंत, जातपात-वर्णभेदाच्याही पलीकडे जाऊन, लादलेले बंधन तोडून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे, प्रसंगी एकमेकांसाठी जीव देण्यासही तयार असणारे युगूल आपण चित्रपटांतून अनेकदा पाहिले. मग त्यात ‘लैला-मजनू‘, "हिर-रांझा‘, "सोहनी-महिवाल‘पासून अगदी अलीकडे आलेल्या ‘देवदास‘, ‘रामलीला‘, "प्रेम रतन धन पायो‘ यांसारखे चित्रपटही काहीशी याचीच साक्ष देतात. या सर्वांमध्ये आता मिर्झा-साहिबानच्या पंजाबी लोककथेवर आधारित राकेश ओमप्रकाश मेहरांच्या "मिर्झिया‘ची भर पडली आहे. 

"भाग मिल्खा भाग‘, "रंग दे बसंती‘ आणि "दिल्ली 6‘ यांसारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट रसिकांना देणारे राकेश मेहरा "मिर्झिया‘च्या निमित्ताने पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले आहेत. पंजाब प्रांतात त्या काळी गाजलेल्या मिर्झा-साहिबान, हिर-रांझा, सोहनी-महिवाल, सासी-पुनाऊन या प्रेमकथा चांगल्याच गाजल्या. त्यांपैकी हिर-रांझा, सोहनी-महिवाल हे प्रेमकथेचे विषय घेऊन चित्रपट निघाले. मेहरा यांनी मिर्झा-साहिबानच्या लोककथांना आपल्या शैलीत साकारण्याचा प्रयत्न करत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ऍक्‍शन, ड्रामा रोमान्स या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या या चित्रपटाद्वारे नाशिकची संयमी आणि हर्षवर्धन हे दोघेही प्रथमच बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत. दोघांनीही चित्रपटांसाठी खूप मेहनत केली आहे. 

"रे‘ या तेलगू चित्रपटाद्वारे संयमीने आपल्या करिअरची सुरवात केली होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनुभव तिला आहे. पण हिंदीत काम करताना थोडी धाकधूक होती, असे ती प्रामाणिकपणे नमूद करते. पण काहीही असो सुखदुःखाच्या प्रसंगांना तसेच येणाऱ्या प्रत्येक संकटाला हर्षवर्धनला तिने खंबीरपणे साथ देत प्रेमीयुगुलाने शेवटपर्यंत कसे एकसंध राहिले पाहिजे हेच दाखविले आहे. हर्षवर्धन चित्तथरारक स्टंट करण्याबरोबरच मोटारसायकल चालविणे, घोडेस्वारी करताना दिसेल. 

चित्रपटातील सौंदर्य आणि नयनरम्य दृश्‍यही डोळ्यांना सुखावणारे आहे. सर्वाधिक चित्रीकरण लडाख, राजस्थान व बाडमेर येथे झाले असून, पाकिस्तानपासून केवळ सतरा किलोमीटर दूरवरही काही चित्रीकरण केले आहे. लडाखचा नैबारा, पहलगाम, उदयपूर, फतेहगड पॅलेस, शिवनिवास पॅलेससारख्या ठिकाणी शूटिंग करताना दोघांचाही कस लागला. प्रख्यात गीतकार गुलजार यांचे टायटल सॉंगचे शब्द आणि कथा-पटकथाही आहे. वेगळ्या धाटणीचे संगीत शंकर एहसान लॉय या त्रिवेणी जोडीने संगीतबद्ध केले आहे. त्याचे आमिर खाननेसुद्धा कौतुक केले आहे. दलेर मेहंदीने गायलेल्या मिर्झिया टायटल सॉंगला आधीच प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले आहे. त्यापाठोपाठ "सौ गवा है‘ गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

शंकर-एहसान-लायच्या संगीताने चित्रपटाला चारचॉंद प्राप्त होतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चित्रपटात अंजली पाटील ही हर्षवर्धनची बालपणाची मैत्रीण दाखविली आहे. 

संयमीच्या रूपाने तिसऱ्या पिढीचे पदार्पण 

मूळची नाशिकची असणाऱ्या संयमीच्या आजी उषाकिरण यांनी वेगळ्या भूमिका आणि गाण्यांमुळे एके काळी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांची ही नात आणि आई मिस इंडिया उत्तरा खेर-म्हात्रे, वडील प्रख्यात मॉडेल, व्यावसायिक अद्वैत खेर यांची कन्या आहे. संयमीच्या रूपाने खेर घराण्याची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने त्यामुळेच तिच्या भूमिकडेही रसिकांचे लक्ष आहे. एवढेच नव्हे, तर तन्वी आझमी तिच्या आत्या आहेत. त्यामुळे नाशिकला झालेले शिक्षण आणि घरातच मिळालेले बाळकडू हा आणखी एक प्लस पॉइंट आहे. 

जेव्हा संयमीचा जन्म झाला तेव्हा डाव्या हाताच्या कोपरावर तिला घेतले होते आणि ती एवढ्या लवकर मोठी कशी झाली ते कधी कळलेच नाही. आम्ही दोघे बोलत असतो तेव्हा आमचा नेहमी विषय होतो, मुली किती छोट्या होत्या (संस्कृती आणि संयमी) आणि किती पटकन मोठ्या झाल्या. संयमीचा आज चित्रपट प्रदर्शित होत आहे याचा आनंद शब्दात न व्यक्त करण्यासारखा आहे. 

- अद्वैत खेर आणि उत्तरा म्हात्रे-खेर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com