सुरेशदादा जैन यांचे  प्राणायाम अन्‌ वाचन 

सुरेशदादा जैन यांचे  प्राणायाम अन्‌ वाचन 

सुरेशदादा जैन यांचे 
प्राणायाम अन्‌ वाचन 

शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची आक्रमक आणि तितकेच संयमी नेते म्हणून राज्यात ओळख आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही ते तंदुरुस्त आहेत. आजही प्रचारात पायी चालण्याचा त्यांचा आग्रह असतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज सकाळी वॉकिंग, प्राणायाम, फिजिओथेरपी करण्यासह मानसिक तंदुरुस्तीसाठी दररोज "वाचन' हे त्यांच्या दिवसभराच्या ऊर्जेचे रहस्य आहे. 
-- 
धडाडीचे व्यक्तिमत्त्व अशी जैन यांची ओळख आहे. राजकीय जीवनात नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार ते मंत्रिपद शिवाय सहकार क्षेत्रातही त्यांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. जीवनात त्यांना काही अडचणीही आल्या, परंतु ते डगमगले नाहीत. विशेष म्हणजे संघर्षाच्या काळातही त्यांनी आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले. दररोज व्यायामाचा नित्यनेम हेच त्यांच्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे. 

असा आहे दिनक्रम 
कामात कितीही व्यस्त असले, तरी दररोज पहाटे पाचला ते उठतात. आपल्या शिवाजीनगरातील निवासस्थानावरून वाहनाने ते जैन हिल्सवर जातात, त्या ठिकाणी ते "वॉकिंग' करतात. तब्बल साडेतीन ते पाच किलोमीटर ते चालतात. त्यानंतर याच ठिकाणी ते प्राणायाम आणि योगा करतात. त्यानंतर फिजिओथेरपी करतात. पुन्हा शिवाजीनगरातील निवासस्थानी आल्यावर ते नाष्टा, कॉफी घेतात. त्यानंतर सकाळी ते वाचन करतात. थोर नेत्यांचे आत्मचरित्र, सामाजिक ग्रंथ, तसेच यशोगाथा यांचे ते वाचन करतात. या शिवाय दैनिकांचे अग्रलेखही ते आवर्जून वाचतात. मानसिक तंदुरुस्तीसाठी "वाचन'आवश्‍यकच आहे. असे त्यांचे मत आहे. 

सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी ते निवासस्थानातील हॉलमध्ये येतात. त्या ठिकाणी ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा करतात. दुपारी बाराला सूप, एकला जेवण आणि नंतर अर्धा तास विश्रांती... त्यानंतर पुन्हा हॉलमध्ये येऊन ते चर्चा करतात. सायंकाळी साडेपाचला कॉफी, साडेसहाला ज्यूस घेतात. रात्री आठला कुटुंबासमवेत जेवण आणि त्यानंतर झोप, असा त्यांचा दिनक्रम आहे. विशेष म्हणजे जळगावात असताना असलेला व्यायाम आणि आहारासंदर्भातील दिनक्रम ते बाहेरगावीही चुकवीत नाहीत. प्रवासात ते बाहेरचे काहीही खात नाहीत. नेहमी घरून डबा घेऊनच ते निघतात. अगदी राजकीय प्रचारात असले, तरी जेवणाचा डबा त्यांच्या सोबत असतोच. 

राजकीय किंवा सर्वसामान्य जीवनातही प्रत्येक व्यक्तीने आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. व्यायामामुळे शारीरिक तंदुरुस्ती होतेच, परंतु सोबत वाचनही केले पाहिजे. त्यामुळे मानसिक तंदुरुस्तीही राहते आणि दिवसभराच्या कामात त्याची ऊर्जा मिळते. 
- सुरेशदादा जैन, शिवसेना नेते. 
 

सुरेशदादांचा फिटनेस फंडा 
* सकाळी पहाटे पाचला वॉकिंग 
* प्राणायाम, योगा 
* साहित्याचे वाचन 
* सकाळी नाश्‍ता 
* दुपारी हलके जेवण 
* सायंकाळी फलाहार 
* रात्री आठला जेवण 
* प्रवासात घरचा डबा, तेलकट वर्ज्य 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com