खाणीत नोकरीच्या आमिषाने 14 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाची असल्याचा बनाव

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाची असल्याचा बनाव
नाशिक - गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भाची असल्याचे सांगून गोव्यातील खाणीमध्ये अभियंत्याच्या नोकरीचे आमिष दाखवून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना तब्बल 14 लाख 70 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रूपाली सिद्धेश्‍वर शिरूरे (रा. फ्लॅट नं. 2, वृषाली अपार्टमेंट, गजपंथ स्टॉपजवळ, म्हसरूळ) असे संशयित महिलेचे नाव असून सध्या ती फरारी आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान विठ्ठल ठाकरे (रा. बालाजी अपार्टमेंट, एस्सार पेट्रोलपंपामागे, दिंडोरीरोड) या युवकाने याबद्दल फिर्याद दिली आहे. सोपान ठाकरे हा अभियंता असून अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनीमध्ये नोकरी आहे. आतेबहीण प्रीती विजय मोरे (रा. कनक अपार्टमेंट, दिंडोरीरोड) यांच्याकडे तो जेवणासाठी जात असे. मोरे यांच्या मुलाची शिकवणी घेण्यासाठी येत असलेल्या रूपाली शिरूरेशी ठाकरे यांची गेल्या वर्षी ओळख झाली. लष्कराच्या कार्यालयात आपल्या ओळखी असून माझे मामा दिगंबर कामत हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. गोव्यातील खाणींमध्ये अभियंत्याची गरज असते. तेथे तुम्हाला नोकरी लावून देते असे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची मागणी केली. एवढे पैसे आपल्याकडे नसल्याचे सोपान ठाकरे याने सांगितले असता, "सुरवातीला 50 हजार रुपये द्या, बाकीचे नंतर द्या,' असे सांगत तिने विश्‍वास संपादन केला.

सोपान ठाकरे व मित्र प्रकाश सुधाकर जगतापला यांनी रूपालीने दिलेल्या बॅंकेच्या खात्यावर प्रत्येकी 50 हजार रुपये भरले. त्यानंतर तिने दूरध्वनी करून नोकरी नक्की झाल्याचे सांगत तिकिटासाठी अठराशे रुपये उकळले. मात्र नंतर रेल्वेचे तिकीट कन्फर्म नसल्याचे सांगत गाडीने गोव्यास जाण्याचे तिने सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा दूरध्वनी करून गोव्यात सध्या निवडणूक असल्याने पुढच्या महिन्यात जाण्याचे सांगितले. पुढची माहिती देण्यासाठी ठाकरे याचा "ई-मेल' आयडी घेतला. काही दिवसांनी मेलवर परीक्षेचे वेळापत्रक टाकले. 21 मे रोजी परीक्षा असली, तरी 19 मे रोजीच पेपर मिळेल आणि मुंबईला परीक्षेला जावे लागेल, असे सांगितले. मात्र त्यानंतर पुन्हा संपर्कच झाला नाही. ठाकरे याने रूपाली राहत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता फ्लॅटला कुलूप होते. ठाकरे याच्याप्रमाणेच आणखी काही जणांना नोकरीचे आमिष दाखूवन फसविले होते. एकूण 14 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात रूपालीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: 14 lakh cheating in nashik