फॅब्रिकेटेड अंगणवाड्यांवर १६ कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

जिल्हा परिषद दोन महिन्यांत करणार विनियोग; कंपनी थेट गावात पोहोचविणार लाभ
धुळे - जिल्हा परिषदेला प्राप्त १६ कोटींचा निधी फॅब्रिकेटेड अंगणवाड्यांवर खर्च करण्याचे नियोजन झाले आहे. दोन महिन्यांत हा खर्च करण्याची कसब पणाला लावली जाईल. लाभार्थी गावांची यादी संबंधित कंपनीला दिल्यानंतर थेट त्या गावातच कंपनीचे प्रतिनिधी सरपंचांच्या मदतीने फॅब्रिकेटेड अंगणवाडी उभारण्याचे काम करतील.  

जिल्ह्यात सद्यःस्थितीत सरासरी १६७ अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू आहे. याकामी आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रासाठी सुमारे पाच कोटींचा निधी खर्च होत आहे. सरकारने २०१५-१६ साठी हा लाभ दिल्यानंतर चालू वर्षासाठी जिल्ह्याला पुन्हा सुमारे १६ कोटींच्या निधीची तरतूद झाली. ती जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. यातून २५४ अंगणवाड्या करण्याचे नियोजन आहे. या सर्व अंगणवाड्या फॅब्रिकेटेड असतील. याकामी निविदा काढली जात आहे. 

फॅब्रिकेटेड अंगणवाड्या
जिल्हा परिषद प्रशासनाने २५४ फॅब्रिकेटेड अंगणवाड्यांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच संबंधित गावांमध्ये जागांचीही तजवीज झाली आहे. फॅब्रिकेटेड अंगणवाड्यांचा पुरवठा करणारी कंपनी त्या- त्या गावातील सरपंचांशी संपर्क साधून नियोजित जागेवर काम करेल. नंतर छायाचित्र सादरीकरणानंतर कंपनीला बिले अदा होईल. नियोजनांतर्गत बिगरआदिवासी क्षेत्रातील ५० आणि आदिवासी क्षेत्रातील २९ अंगणवाड्यांचे बांधकाम प्रस्तावित होते. मात्र, त्याऐवजी फेब्रिकेटेड अंगणवाड्या केल्या जातील. मार्चअखेर प्राप्त १६ कोटींचा निधी खर्च करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

असा मिळेल लाभ
आदिवासी क्षेत्रात फॅब्रिकेटेड अंगणवाडीसाठी प्रत्येकी सहा लाख ६० हजार, तर बिगर आदिवासी क्षेत्रात प्रत्येकी सहा लाखांचा निधी खर्च होईल. जिल्ह्यात दोन महिन्यांत केवळ फॅब्रिकेटेड अंगणवाड्यांसाठी १६ कोटींचा निधी खर्च होणार असल्याने हा बहुचर्चित विषय ठरत आहे.