राज्यात 30 हजार गावांत नववर्षात बॅंकिंग सेवा 

विनोद बेदरकर
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नाशिक : राज्यातील 30 हजार तर नाशिक जिल्ह्यात 960 गावांत 'आपले सरकार' नावाने केंद्रातून डिजिटल बॅंकिंगची सुविधा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नवीन वर्षात सुरू होणार आहे. मुख्य सचिवांनी राज्यातील कॅशलेस बॅंकिंग कामकाजासाठी सोमवारी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक गावात पूर्वीच्या संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात 'संग्राम' केंद्रात 'आपले सरकार' उपक्रम सुरू करण्याचा आदेश दिला. 

नाशिक जिल्ह्यात 950 गावांतील ग्रामपंचायतीत नववर्षात ही केंद्रे कार्यान्वित होतील असे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीनंतर आता 'कॅशलेस' अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांनी आज बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंक अधिकाऱ्यांची बैठक घेत कामकाजाच्या सूचना दिल्या.

राज्यातील प्रत्येक गावात डिजिटल बॅंकिंग सुरू करण्याच्या दिशेने ही केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. राज्यात 2011 ते 2015 या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात 'संग्राम' हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर पुढचे पाऊल म्हणून हा कार्यक्रम राबविला जात आहे. ग्रामविकास विभाग, माहिती तंत्रज्ञान संचालनालय आणि सीएससी-एसपीव्ही-ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या केंद्र सरकार पुरस्कृत उपक्रमातून हा प्रकल्प चालेल. ग्रामपंचायतींशी संबंधित नसलेल्या नागरिकांसाठी जिल्ह्यातील 960 गावांत केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. केंद्रासाठी बॅंकांकडून उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधांबाबत बॅंक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. ज्यांचे बॅंकेत खाते नाही अशा असंघटित कामगारांचे खाते उघडण्यात येणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, आतापर्यंत तीन हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. 

'आपले सरकार'मधील सेवा 
या केंद्रात जन्मनोंदणी व प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व प्रमाणपत्र, विवाहाचा दाखला, नोकरी-व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र, याशिवाय रेल्वे व बस आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅंकिंग सेवा, ई-कॉमर्स, पॅन कार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ते भरणे, पासपोर्ट, वीजबिल भरणे, टपाल विभागाच्या सेवा दिल्या जाणार आहेत.