अध्ययन केंद्र जमीनदोस्त; ३५ वर्षांनी रस्ता खुला!

encroachment
encroachment

धुळे - शहरासह जिल्ह्यात आठवड्यापासून बहुचर्चित ठरलेले महापालिकेजवळील अतिक्रमित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र आज दुपारी बारापर्यंत जमीनदोस्त झाले. यामुळे तब्बल ३५ वर्षांनंतर महापालिकेजवळून राजवाडे चौकास जोडणारा रस्ता खुला झाला. तो पाहण्यासाठी गर्दी झाली, तर काही पादचाऱ्यांनी वापरही सुरू केला. महापालिकेने खडी टाकून पक्का रस्ता करण्याची प्रक्रिया सुरू केली.

महापालिकेला लागूनच १९८१ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुद्देशीय शैक्षणिक- सांस्कृतिक मंडळाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र होते. त्याचे दलित नेते एम. जी. धिवरे अध्यक्ष आहेत. यात पर्यायी जागेच्या मागणी झालेल्या संयुक्त चर्चेवेळी श्री. धिवरे यांनी आयुक्तांना ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे हा वाद चिघळला. शिवाय, श्री. धिवरे यांनी न्यायालयातही धाव घेतली होती; परंतु श्री. धिवरे यांनी बुधवारी (ता. ११) स्वतःहून केंद्र हटवून जागा रिकामी करून देत असल्याची स्वागतार्ह भूमिका जाहीर केली. यानंतर पोलिस बंदोबस्तात आज सकाळीच केंद्राचे बांधकाम पाडण्यात आले.

नेमका लाभ काय?
अध्ययन केंद्राची अतिक्रमित इमारत हटवून रस्ता खुला करावा, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी केली होती. कारवाईनंतर महापालिकेजवळून थेट राजवाडे चौक, फिदाअली पेट्रोलपंपाकडे जाणारा रस्ता खुला झाला. त्यामुळे वाहतुकीचा बराच भार कमी होऊ शकेल. या रस्त्यावरील एक क्‍लबही चार जानेवारीला जमीनदोस्त करण्यात आला होता. त्यावेळी अध्ययन केंद्राचे बांधकाम हटविण्यास धिवरे समर्थकांनी विरोध केला होता. तो धमकी प्रकरणानंतर मावळला. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सकाळी नऊला दोन ‘जेसीबी’च्या सहाय्याने अतिक्रमण हटविले. शांततेत ही कारवाई झाली. श्री. धिवरे, महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे, प्रभारी नगररचनाकार प्रदीप चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.

आता शिवसेनेचे कार्यालय
या कारवाईनंतर महापालिकेने आता भगवा चौकातील शिवसेनेचे महानगर शाखा कार्यालय हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना तोंडी नोटीस दिली.

आमदार गोटेंची १८ अतिक्रमणांबाबत तक्रार

आमदार अनिल गोटे यांनी १८ अतिक्रमणे काढण्याची मागणी केली आहे. तशी तक्रारही प्रशासनास दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की पांझरा नदीकाठावरील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्त्वज्ञान मंदिर (पाडण्याची प्रक्रिया सुरू), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र (जमीनदोस्त), रस्ता बंद करणारी जयहिंद कॉलनीतील मॉडर्न नर्सरीसमोर रस्त्याला लागून असलेली गुणवंत देवरे यांची इमारत, कुंभार गुरुजी शाळेच्या मागे मारुती मंदिराजवळचा रस्ता, मोठ्या पुलाजवळील स्वामी समर्थ केंद्र व शीतलादेवी मंदिर, सुधा हॉस्पिटलकडून सावरकर पुतळ्याकडे जातानाची पश्‍चिम किनाऱ्यावर असलेली अतिक्रमित घरे, स्टेशन रोडवरील अतिक्रमित वसाहत, मोठ्या पुलापासून श्री एकवीरादेवी मंदिरापर्यंत असलेली मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे, मोठ्या पुलापासून ते जुने धुळे- कानुश्री मंगल कार्यालयासह डायव्हर्शन पुलापर्यंत सर्व अतिक्रमणे, भगवा चौकातील शिवसेना कार्यालय, मोकळ्या जागेवर बांधलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय, पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यासमोरील अतिक्रमित मंदिर, अग्रसेन पुतळ्यासमोरील देशी दारूचे दुकान, आग्रा रोडवरील श्री एकवीरादेवी मंदिर कमानीलगत असलेली नेहरू चौकापासून असलेली सर्व अतिक्रमित दुकाने, नेहरू पुतळा ते जाळीचा पूल रस्त्याला लागून असलेली अतिक्रमणे, सुभाष पुतळा ते वरखेडी रस्त्यावरील कुंभार खुंटापासूनची सर्व अतिक्रमणे, मार्केट कमिटीला लागून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे, ८० फुटी रस्ता पाला बाजार ते जमनालाल बजाज मार्गावरील अतिक्रमणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com