जळगावात 4 वर्षांच्या बालकाला डंपरने चिरडले

संदीपान वाणखेडे
बुधवार, 19 एप्रिल 2017

सैरभैर चिमुकला जीव गेला...

वाळू भरून घेऊन जाणारा डंपर (MH 19 Y 3757) भरधाव वेगाने आला असता दक्ष व त्याचा छोटा चुलतभाऊ हे दोघे विरुद्ध दिशांना पळाले, आणि दक्ष गाडीच्या पुढच्या चाकाखाली आला. लहानग्या दक्षच्या कंबरेवरून डंपरचे चाक गेले. त्यामध्ये तो जागीच गतप्राण झाला. 

जळगाव : येथील निमखेडी रस्त्यावरील कल्याणीनगर भागात जुन्या हायवेवर एका डंपरने 4 वर्षांच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली. दक्ष कैलास भदाणे असे त्या लहानग्याचे नाव असून, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. 

सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास हितवर्धनी सोसायटीतील दक्ष व त्याचा छोटा चुलतभाऊ हे त्यांचे चुलते विनोद भदाणे (वय 20) यांच्यासोबत घरातला कचरा फेकण्यासाठी रस्ता ओलांडून जात होते. त्यावेळी गिरणा नदीतून वाळू भरून घेऊन जाणारा डंपर (MH 19 Y 3757) भरधाव वेगाने आला असता दक्ष व त्याचा छोटा चुलतभाऊ हे दोघे विरुद्ध दिशांना पळाले, आणि दक्ष गाडीच्या पुढच्या चाकाखाली आला. लहानग्या दक्षच्या कंबरेवरून डंपरचे चाक गेले. त्यामध्ये तो जागीच गतप्राण झाला. 

या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपरच्या चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने लगेच पोबारा केला. संतप्त लोकांनी पुढचा कॅबिनचा भाग पेटवून दिला. पोलिस घटनास्थळी येण्याआधी डंपरचा चालक पळून गेला. पोलिसांनी अग्निशामक दलाला कळविल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी डंपरची आग विझवली. दरम्यान, दक्ष याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
 

फोटो गॅलरी