शहाद्यात 50 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

भाजपच्या दोन नगरसेविकांच्या पतीसह तीन ताब्यात

भाजपच्या दोन नगरसेविकांच्या पतीसह तीन ताब्यात
धुळे - चलनातून बाद झालेल्या तब्बल 50 लाख किमतीच्या हजार व पाचशेच्या जुन्या नोटा घेऊन येथे आलेले शहाद्यातील (जि. नंदुरबार) तिघे संशयित सोमवारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यात भाजपच्या दोन नगरसेविकांच्या पतींसह अन्य एका व्यापाऱ्याचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील कारवाई प्राप्तिकर विभागाकडून होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहादा येथून नाशिककडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मोटारीमधून हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा नेल्या जाणार असल्याची माहिती धुळ्यातील आझादनगरच्या पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. नटराज चित्रपटगृहाजवळील रस्त्यावर पोलिसांना त्या वर्णनाची मोटर (क्र. एमएच 39 जे 8663) उभी दिसली. त्यात एक जण होता, तर अन्य दोघे बाहेर होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

पथकाने मोटीरीची तपासणी केली असता मागच्या आसनाखाली पिशवी होती. त्यात चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशेच्या नोटा दिसल्या. याप्रकरणी पोलिसांनी मोटारीसह संतोष सुरेश वाल्हे, साजिद साहेर अन्सारी, अजय लक्ष्मीकांत छाजेड या संशयितांना ताब्यात घेतले.

संतोष हा शहादा पालिकेतील भाजपच्या नगरसेविका योगिता वाल्हे यांचा, तर साजिद हा याच पक्षाच्या नगरसेविका सईदाबी अन्सारी यांचा पती आहे. संशयित अजय हा व्यापारी असून, दोन ते तीन वर्षांपूर्वी तो वाळूच्या बनावट रॉयल्टीप्रकरणी ठाण्याच्या कारागृहात होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. हिशेब देऊन चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशेच्या नोटा 31 मार्चपर्यंतच स्वीकारण्याची मुभा बॅंकांना दिली होती. असे असतानाही धुळ्यात "हवाला'मार्फत नोटा बदलून मिळत असल्याने शहाद्यातील तिघे येथे आल्याचे बोलले जाते.