असिस्टंट कमांडंटपदी जळगावचा अभ्युदय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

युपीएससीसारख्या परीक्षेत खानदेशातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खरोखरच गौरवास्पद आहे. देशात 32 व्या रॅंकने मिळविलेल्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांच्याही पुढे खानदेशातील विद्यार्थी मार्गक्रमण करताना दिसत आहेत. 
- गोपाल दर्जी, संचालक, दर्जी फाउंडेशन 

जळगाव - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेंट्रल आर्मड्‌ फोर्सेसच्या असिस्टंट कमांडंटसाठी 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात जळगाव येथील अभ्युदय निंबा साळुंखे याने भारतात 32 व्या रॅंकने उल्लेखनीय यश मिळविले असून, त्याची असिस्टंट कमांडंटपदी निवड झाली आहे. त्याला दर्जी फाउंडेशनचे मार्गदर्शन लाभले. 

शहरातील भिकमचंद जैन नगरातील रहिवासी असलेले अभ्युदय साळुंखेने बी. टेक.चे शिक्षण घेतलेले असून, गट "अ'चा अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न साकार झालेले आहे. दर्जी फाउंडेशनमध्ये अध्यापनाचे कार्य करत असतानाच त्याने या परीक्षेसाठी मुलाखतीचे परिपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेसोबतच त्याने नुकतीच युपीएससीचीच सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षाही दिलेली आहे. तसेच 2013 मध्ये इंटेलिजन्स ब्युरोच्या परीक्षेअंतर्गत एसीआयओ व 2014 मध्ये स्टाफ सिलेक्‍शन अंतर्गत टॅक्‍स असिस्टंटपदीही त्याची निवड झाली होती, तो सध्या चंडीगड येथे टॅक्‍स असिस्टंटपदी कार्यरत आहे. आपल्या यशात आई-वडिलांसह दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाल दर्जी यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे मत अभ्युदय साळुंखेने व्यक्त केले. 

युपीएससीसारख्या परीक्षेत खानदेशातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खरोखरच गौरवास्पद आहे. देशात 32 व्या रॅंकने मिळविलेल्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांच्याही पुढे खानदेशातील विद्यार्थी मार्गक्रमण करताना दिसत आहेत. 
- गोपाल दर्जी, संचालक, दर्जी फाउंडेशन 

Web Title: Abhuyoday salunkhe select in UPSC