गाव बनले व्हिलेज: क्रांतिकारी आडगावची ठसठस कायम

महेंद्र महाजन
शुक्रवार, 19 मे 2017

आडगावकरांची गरज लक्षात घेऊन अडीच एकरावर उभारलेल्या महालक्ष्मी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानाच्या देखभालीकडे महापालिकेने लक्ष देऊन अवैध धंद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करायला हवेत. आरोग्यसेवेचे केंद्र उभारावे. भगूर रस्ता, चारी सात रस्त्यावरील वाहून गेलेल्या मोरींची दुरुस्ती व्हावी. जिल्हा बॅंकेचे वीजबिल भरणा केंद्र बंद झाल्याने कामगारनगरला स्थानिकांना जावे लागते, ही गैरसोय दूर होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे "मविप्र'च्या वैद्यकीय महाविद्यालयाशेजारील गट क्रमांक 1081 मध्ये आरक्षित असलेल्या तीन एकरवर महापालिकेने इंग्रजी आणि मराठी माध्यमाची शाळा उभारावी. शेतकरी मळ्यात राहूनही महापालिकेचा कर भरतात म्हटल्यावर पथदीपांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करायला हवी.
- अॅड. जे. टी. शिंदे, माजी नगरसेवक

नाशिक : संत तुकडोजी महाराजांच्या हस्ते शाळेसह गावातील उपक्रमांची सुरवात, संत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छतेचा दिलेला संदेश, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक दिवस केलेला मुक्काम अशी परंपरा लाभलेले आडगाव... माजी महापौर प्रकाश मते, सह्याद्री अॅग्रो फार्मचे विलास शिंदे, आदर्श पोलिसपाटील सीताराम पाटील-लभडे, अॅड. छबीलदास माळोदे यांचे, तर माजी खासदार अॅड. विठ्ठलराव हांडे यांच्या मामांचे गाव. डाव्या विचारसरणीकडे कल असलेले आडगाव शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर होणाऱ्या आंदोलनांमुळे क्रांतिकारी म्हणून ओळखले जाते. या आडगावची जुन्या मुंबई-आग्रा महामार्गाची ठसठस कायम आहे. पूर्वीच्या अन्‌ आताच्या आडगावचा घेतलेला वेध...

नांदूर-मानूर, विंचूरगवळी, सिद्धपिंप्री, ओढा, शिलापूर, माडसांगवी, निफाड तालुका, जऊळके, शिवनई, वरवंडी, म्हसरूळ भागाची शीव एवढा मोठा शिवार असलेल्या आडगाव शेतकऱ्यांचे असल्याचा परिचय अजूनही टिकून आहे. स्थानिक मळ्यांमध्ये राहायला गेले असून, नोकरदार, भाडेकरूंची संख्या गावात वाढली आहे. गावात 15 हजार, तर कोणार्कनगर, श्रीरामनगर, समर्थनगर, धात्रक फाटा, शरयू पार्क या भागात 14 हजारांची लोकसंख्या आहे. शिंदे, माळोदे, मते, लभडे, नवले, हळदे, झोमान, धारबळे, दुशिंग, साठे, कदम, भोर यांचे गाव म्हणून आडगावची ओळख होती. माळी बांधवांचे राऊत कुटुंबीय, शेख-सय्यद ही मुस्लिम बांधवांची कुटुंबे आणि जाधव परिवार यांचेही वास्तव्य आहे. दलित बांधवांची लोकवस्ती 700 च्या आसपास आहे.

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, भुजबळ नॉलेज सिटी, के. के. वाघ शिक्षण संस्था, जिल्हा पोलिस मुख्यालय यांनी गावाच्या वैभवात भर घातली आहे. मुंबई-आग्रा महामार्ग पूर्वी आडगावमधून जात होता. विस्तारीकरणात हा महामार्ग गावाबाहेरून गेला आहे. मात्र, वैद्यकीय महाविद्यालय ते जुना जकात नाका असा अडीच किलोमीटरच्या जुन्या महामार्गाची देखभाल-दुरुस्ती स्थानिकांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा बनला आहे. हा भाग महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यामुळे जुन्या महामार्गाची देखभाल-दुरुस्ती महापालिकेने कशी करायची? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पण दुसरीकडे महामार्ग प्राधिकरणाकडूनही देखभाल-दुरुस्तीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची आडगावकरांची तक्रार आहे.

शाळेच्या जागेच्या प्रश्‍नाने काढले डोके वर
बळी मंदिर ते उड्डाणपूल आणि पुढे वैद्यकीय महाविद्यालय ते दहावा मैल या भागात शेतीचे अस्तित्व टिकून आहे. द्राक्षे, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंबाचे उत्पादन येथे घेतले जाते. दोन हजार 600 हेक्‍टरपैकी अजूनही एक हजार 800 हेक्‍टरवरून अधिक क्षेत्रावर शेती केली जाते. इथल्या शेतजमिनीचा भाव 50 लाखांपासून पाच कोटींपर्यंत एकर इतका आहे. पिवळ्या पट्ट्यातील जागेसाठी 15 हजार चौरस मीटर असा भाव आहे. महापालिकेच्या 69 आणि 70 क्रमांकाच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. पहिली ते दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय शायनिंग स्टारने केली. सेंट पीटर, अनमोल शिक्षण संस्था या भागात आहेत. रयत शिक्षण संस्थेची पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा आहे. सरकारतर्फे मध्यंतरी "म्हाडा'च्या 448 घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी रयत शिक्षण संस्थेसाठी जागेचा आग्रह धरत विरोध झाला. तसेच विरोधकांच्या संघर्ष यात्रेतही हाच मुद्दा स्थानिकांनी प्रभावीपणे मांडला. त्यासंबंधाने नगरसेवक उद्धव निमसे आणि माजी नगरसेवक अॅड. जे. टी. शिंदे या दोघांनी दोन बाजू मांडल्या. पुलोद सरकार असताना गट क्रमांक 1560 मधील साडेतीन एकर जागा शाळेला दिली. त्यावर माध्यमिक शाळा इमारत उभी राहिली. दीड हजार मुले शिक्षण घेत आहेत. 1985 पासून पुढील अडीच एकर जागा शाळेसाठी मागत होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबद्दल लक्ष दिले नाही. आमदार बाळासाहेब सानप यांनी शाळेला जागा मिळवून देतो, असे आश्‍वासन दिले. मात्र, प्रगती झाली नाही. त्यामुळे स्थानिकांचा विरोध कायम असल्याचे अॅड. शिंदे यांनी सांगितले. श्री. निमसे यांना ही बाब मान्य नाही. ते म्हणाले, की रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या विकासाकडे जबाबदारी असलेल्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. शाळेसाठी जागेची मागणी करण्यात आली नाही. घरकुलांसाठी सूचना-हरकती मागण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. प्रकल्प मंजूर झाला, निविदा निघाल्या आणि भूमिपूजनाच्या अगोदर विरोध सुरू झाला. ही बाब योग्य नाही. शाळेचा विकास व्हायला हवा. त्यासाठी देणगीदार मिळवून देण्याची आपली तयारी आहे.

अपेक्षा आडगावकरांच्या...
- नेत्रावती नाल्याचा परिसर निसर्गरम्य होता. नाल्याचे पाणी स्वच्छ असल्याने ते पिल्याच्या आठवणी आहेत. याच नाल्याला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले. शौचालयाचे पाणी गटारींऐवजी नाल्यातून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. हे पाणी तातडीने गटारींमध्ये सोडण्याची व्यवस्था करत असताना सार्वजनिक शौचालयांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. याशिवाय स्मशानभूमी ते आडगाव हद्दीपर्यंत नेत्रावती नाला बंदिस्त करून डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवावे.
- मखमलाबाद शिवार, आडगाव हद्द, मानूर भागातील कालवा बंदिस्त करावा. गटारीचे पाणी त्यात मिसळणार नाही, याची काळजी घ्यावी.
- कॉलनींमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी. कमी दाबाने पाणी येत असल्याने टॅंकरने पाणी घ्यावे लागते. आडगावच्या दक्षिण भागातील मळे परिसरात पाण्याची सुविधा व्हावी.
- वेशीवरील इमारतीमध्ये ई-सुविधा केंद्र सुरू केल्याने महापालिकेचे कार्यालय समाज मंदिरात हलविण्यात आले. महापालिकेचे कार्यालय स्थानिकांच्यादृष्टीने सोयीच्या ठिकाणी असावे.
- जुन्या महामार्गालगत बसथांब्याची व्यवस्था आहे. पण प्रवाशांची संख्या आणि वाहतुकीचा विचार करून बसथांब्याचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे.

पुण्याच्या मगरपट्ट्याच्या धर्तीवर आडगावची "आयटी पार्क' अशी ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. आयटीसाठी जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विचार असून, सद्यःस्थितीत सलग क्षेत्राचा प्रश्‍न लवकर मार्गी लागेल. याशिवाय "एज्युकेशन हब' म्हणूनही या भागाला वैभव देण्यास प्राधान्य आहे. ओझर विमानतळावरून वाहतूक सुरू झाल्यावर शेतीमालाच्या कार्गोसाठी लागणारी गुदामे आणि प्रवाशांच्या दृष्टीने हॉटेल व्यवसाय भरभराटीस येईल, अशी अपेक्षा आहे. या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण विकसित व्हावे, त्यासाठी आरक्षण ठेवण्याची तयारी आहे. पडून असलेल्या जकात नाक्‍याच्या जागेवर साड्यांचा होलसेल मॉल उभारण्याचा विचार आहे.
- उद्धव निमसे, नगरसेवक

मुंबई-आग्रा महामार्गाच्या विकासात दहावा मैल ते आडगाव पेट्रोलपंप या मार्गावरील सर्व्हिस रोड झाला नाही. तसेच जत्रा हॉटेल बाह्य, अमृतधाम अंतर्गत, हनुमाननगर मध्य रिंगरोड यापूर्वी झाला. मात्र, या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग नाही. त्यामुळे चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातात 52 जणांना प्राण गमवावा लागला. महामार्गालगतचे पथदीप सुस्थितीत नाहीत. या प्रश्‍नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. हे प्रश्‍न सुटल्यास अपघातांवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होईल.
- अॅड. नितीन माळोदे, रहिवासी

मेन रोडच्या भाजीबाजाराने रोजची कोंडी ठरलेली आहे. हा भाजीबाजार स्वतंत्रपणे वसवण्याची आवश्‍यकता आहे. तसेच हॉटेल जत्रा चौफुली, कोणार्कनगर रस्त्यावर भाजीबाजार भरतो. याचा विचार करून स्वतंत्रपणे भाजीबाजार "बिझनेस सेंटर' म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. सांडपाण्याच्या निचऱ्याची सक्षम व्यवस्था झाल्यास आरोग्याचे प्रश्‍न गंभीर होणार नाहीत.
- युवराज झोमान, सामाजिक कार्यकर्ते

आडगावमध्ये व्यावसायिक संकुल उभारण्यातून व्यवसायासह रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. त्यास प्राधान्यक्रम मिळायला हवा. त्याचबरोबर सातत्याने बंद राहणाऱ्या पथदीपांचा प्रश्‍न सुटायला हवा.
- शिवाजी नवले, रहिवासी

बसथांबा भागात व्यापारी गाळे व्हायला हवेत. त्यातून एक चांगली बाजारपेठ तयार होईल. याशिवाय नाशिककरांप्रमाणे येथील नागरिकांना सुविधा मिळायला हव्यात.
- शिवाजी मते, रहिवासी

आडगाव-भगूर रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्‍न सुटायला हवा. मार्गावरील पथदीप सुरू राहतील, याची काळजी घेण्याची गरज आहे. या भागातील गटारी फुटून त्याचे पाणी थेट विहिरींमध्ये मिसळते. त्यामुळे दोन ते अडीच किलोमीटर परिसरातील पाचशे घरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटायला हवा.
- साहेबराव शिंदे, रहिवासी

लेंडीनाला रस्त्यावर झुडपे वाढली आहेत. या रस्त्याच्या परिसराची डागडुजी व्हायला हवी. तसेच गटारींची व्यवस्था आवश्‍यक आहे. गटारी उघड्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असून, आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतात. त्याची पुनरावृत्ती व्हायला नको.
- नानासाहेब देशमुख, रहिवासी

दगडोबा मंदिर भागातील लकडी पुलाचे काम वेळीच करायला हवे. भगूर, लेंडीनाला रस्त्यांवर वळणे आहेत. त्यामुळे दिशादर्शक फलक लावायला हवेत. जुन्या स्मशानभूमीचे शेड काढून नवीन शेडची उभारणी करावी. स्थानिकांकडून उत्स्फूर्त वृक्षारोपण केले जाईल.
- राजेश शिंदे, रहिवासी
(उद्याच्या अंकात : नांदूर-मानूर)