शिक्षक, शिक्षकेतरांची 31 टक्के पदे रिक्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नाशिक - आदिवासी विकास विभागाच्या शिक्षक, शिक्षकेतरांची 15 हजार 891 पदे मंजूर आहेत. त्यातील प्रत्यक्षात दहा हजार 950 पदे भरली असून, 31 टक्के म्हणजेच, चार हजार 941 पदे रिक्त आहेत. शिक्षकांपासून मुख्याध्यापकांच्या रिक्त पदांचे प्रमाण 44.50 टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अवस्था "आनंदी आनंद' झाली आहे. 

नाशिक - आदिवासी विकास विभागाच्या शिक्षक, शिक्षकेतरांची 15 हजार 891 पदे मंजूर आहेत. त्यातील प्रत्यक्षात दहा हजार 950 पदे भरली असून, 31 टक्के म्हणजेच, चार हजार 941 पदे रिक्त आहेत. शिक्षकांपासून मुख्याध्यापकांच्या रिक्त पदांचे प्रमाण 44.50 टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अवस्था "आनंदी आनंद' झाली आहे. 

राज्य सरकारने 15 जानेवारी 2016 ला दुष्काळाचे कारण देत रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याचे स्वीकारलेल्या धोरणानुसार दोन हजार 70 पदांची प्रक्रिया राबविणे आवश्‍यक आहे. पण प्रत्यक्षात 669 पदांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. सरकारने 16 जुलै 2015 ला रिक्त पदांपैकी 75 टक्के पदे भरण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यात शिक्षकपदाचाही समावेश होता. 

आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमधील अधीक्षक संवर्गातील पुरुषांची 70, महिलांची 210 आणि गृहपाल संवर्गातील पुरुषांची 26, महिलांची 19 अशी 325 पदे भरतीची प्रक्रिया पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. याशिवाय अमरावती अपर आयुक्तालयातर्फे 95 शिक्षकांची भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. ठाण्याचे भरतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. नागपूरमधील 13 पदांच्या भरतीसाठी गुणवत्तेच्या श्रेणीविषयक मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. नाशिक अपर आयुक्तालयातर्फे शिक्षकांच्या प्राथमिकच्या 181, इंग्रजीच्या दोन, माध्यमिकच्या 44, कनिष्ठ महाविद्यालयाच्या 36, अशा एकूण 236 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. 11 हजार 391 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

रोजंदारांचा तिढा कायम 
आदिवासी विकास विभागांतर्गत एक हजार 379 शिक्षक आणि एक हजार 177 शिक्षकेतर अशा दोन हजार 556 पदांवर रोजंदारी पद्धतीने वर्षानुवर्षे काम केले जात आहे. या रोजंदारांनी आंदोलन करत सामावून घेण्याचा आग्रह धरला आहे. वर्ग चारच्या बाह्य  स्रोतामधून शिपाई, स्वयंपाकी, कामाठी, सफाई कामगार अशी 89 पदे मंजूर करण्यात आली आहेत. ही पदे रिक्त आहेत. त्यात 
सर्वाधिक 41 स्वयंपाकी आणि 24 कामाठी पदांचा समावेश आहे. 

संवर्गनिहाय रिक्त पदांची स्थिती 
- माध्यमिक मुख्याध्यापक - 138 
- माध्यमिक शिक्षक - 410 
- कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक - 240 
- प्राथमिक मुख्याध्यापक - 125 
- प्राथमिक शिक्षक - एक हजार 63 
- पदवीधर प्राथमिक शिक्षक - 201 
- क्रीडा आणि चित्रकला शिक्षक - प्रत्येकी 2 
(अपर आयुक्तालयनिहाय ः नाशिक- 955, ठाणे- 462, अमरावती- 355, नागपूर- 409) 

अपर आयुक्तनिहाय भरतीच्या जागा 
अधीक्षक आणि गृहपालांच्या महिला व पुरुषांच्या पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या प्रक्रियेंतर्गत अपर आयुक्तालयनिहाय भरण्यात येणाऱ्या जागांची संख्या अशी ः नाशिक- 150, ठाणे- 102, अमरावती- 46 आणि नागपूर- 27.