प्रतिकूल परिस्थितीत नामपूरच्या सौरभने घातली गगनाला गवसणी

saurabh
saurabh

नामपूर (नाशिक) - जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नामपूर इंग्लिश स्कूलचा सेमी इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी सौरभ अनिल येवला याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवत नामपूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. अत्यंत्य प्रतिकूल परिस्थितीची जाणीव ठेवून सौरभने घेतलेली गगनभरारी आदर्श निर्माण करणारी आहे.

येथील शिवम नगर परिसरात अनिल येवला पत्र्याच्या छोट्याशा खोलीत भाडेतत्वावर राहतात. येथील एका व्यवसायिकाकडे  रोजंदारीवर जमाखर्च लिहिण्याचे काम ते करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी पोटाला चिमटे देऊन त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडु दिली नाही. अशा परिस्थितीची जाणीव ठेवून सौरभने दहावीच्या अभ्यासात स्वताला झोकुन दिले. त्याने दहावीच्या परीक्षेत मिळविलेल्या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आगामी काळात प्रशासकीय सेवेत उच्च पदावर पोचण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.शिक्षणासाठीचा खर्च कुटुंबियांना पेलवणारा नव्हता. तरीही प्रचंड इच्छाशक्ती व शिकण्याच्या जिद्दीमुळे त्याने शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळविले होते. आपल्या लहानश्या पत्र्याच्या घरात सौरभने पाच ते सहा तास अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे. सौरभकडे गुणवत्ता असूनही आता नाशिक, पुणे, मुंबई येथे पुढील महागडे शिक्षण घेणे सौरभला परवडणारे नाही. त्यामुळे आसखेडा अथवा सटाणा येथील महाविद्यालयातच अकरावी विज्ञान शाखेत  प्रवेश घेऊन पुढील शिक्षण घ्यावे आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सनदी अधिकारी व्हावे अशी त्याची मनस्वी इच्छा आहे. सौरभला मुख्याध्यापक सोनवणे, श्रीमती एस डी पगार, एच एन देवरे, ए डी पगार, पी एल ठाकूर, आर सी पाटील, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.  सौरभने मिळविलेल्या यशाबद्दल येथील श्रीहरी विकास प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शरद नेरकर, मुख्याध्यापिका स्नेहलता नेरकर, सागर नेर आदींच्या हस्ते सौरभचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com