जळगाव विमानतळावरून होणार सप्टेंबरमध्ये ‘उडान’!

जळगाव विमानतळावरून होणार सप्टेंबरमध्ये ‘उडान’!

समितीचा अनुकूल अहवाल; सोयी-सुविधांसह कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू

जळगाव - दहा वर्षांपासून ‘शो-पीस’ म्हणून तयार होऊन पडलेल्या येथील विमानतळाचा समावेश केंद्र सरकारने ‘उडान’ योजनेत केल्यामुळे, जळगावातून सप्टेंबरपासून प्रवासी विमानाचे उड्डाण होणार आहे.

यासंदर्भात विमानतळ विकास प्राधिकरणाच्या समितीने नुकताच दौरा करीत विमानतळाची पाहणी केली व प्रवासी सेवा सुरू करण्यासंदर्भात अनुकूल अहवाल दिला. आता ही सेवा सुरू करण्यासंदर्भात विमानतळावर आवश्‍यक सोयी-सुविधांसह कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

शहरातील विमानतळाच्या विकासाचा किस्सा अजब, बहुचर्चित व त्यामुळे वादग्रस्तही राहिला आहे. पालिकेने कर्तव्य नसताना विमानतळ विकासाचे काम हाती घेतले व अटलांटा कंपनीला त्याचा मक्ता दिला. ही निविदाप्रक्रिया, मक्तेदारास दिलेला बिनव्याजी ॲडव्हान्स, त्यात झालेले काम व त्याचा दर्जा ही सर्वच प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली. काम रखडलेच नाही, तर त्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी गुन्हाही दाखल आहे; परंतु या वादग्रस्त प्रक्रियेने विमानतळाचे काम वर्षानुवर्षे रखडले.

तत्कालीन राष्ट्रपतींची सूचना
नंतरच्या काळात खानदेशकन्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या आणि त्यांच्या सूचनेनुसार जळगाव व अमरावती येथे प्रलंबित विमानतळांची कामे तातडीने हाती घेण्यात आली. ती युद्धपातळीवर राबवीत पूर्णही करण्यात आली. २००८ मध्ये जळगावचे विमानतळ पूर्ण झाले.

दशकानंतरही ‘जैसे थे’
तत्कालीन राष्ट्रपतींसाठी विमानतळ सुरू झाले असले, तरी ते ‘व्हीआयपीं’च्या विमानाशिवाय उपयोगाचे नाही. कारण, गेल्या दहा वर्षांत या विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू झाली नाही. विमानतळाची क्षमता कमी असल्याने येथील धावपट्टीवर मर्यादित आकाराचे विमानच उतरू शकते. असे असले तरी २५ सीटर विमानाची प्रवासी सेवा सुरू होण्यासाठी हे विमानतळ योग्य आहे. सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न झाले. काही खासगी विमानसेवा कंपन्यांशी संपर्क करण्यात आला. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विमानतळाची पाहणी केली. येथील उद्योजक, व्यापाऱ्यांसोबत चर्चाही केली. मात्र, उपयोग झाला नाही आणि आज दहा वर्षांनंतरही विमानतळाची अवस्था ‘जैसे थे’ आहे.

‘उडान’च्या सहाय्याने विमानतळाची झेप...!
महिन्यापूर्वी केंद्र सरकारने इतर विमानतळांसोबत जळगाव विमानतळाचाही महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत समावेश केला आहे. या योजनेंतर्गत नांदेड- हैदराबाद सेवा नुकतीच सुरू झाली. त्या धर्तीवर आता सप्टेंबरमध्ये जळगावातूनही विमानाचे ‘टेकऑफ’ होणार आहे. या योजनेंतर्गत जळगाव- मुंबई प्रवासी सेवा सुरू होणार असून, सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रतिप्रवासी २५०० रुपये दर असेल.

कर्मचारी भरतीची गरज
विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळावर पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. सध्या सात-आठ कर्मचारीच असून, सेवा सुरू केल्यानंतर विमानतळावर प्रवासासाठी आवश्‍यक ती औपचारिकता पूर्ण करण्यासाठी किमान वीस कर्मचारी हवेत. त्यादृष्टीने प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिकदृष्ट्या विचार करता, लहान विमानाचे आवागमन होऊ शकेल एवढी धावपट्टी उपलब्ध आहे. तरीही धावपट्टी परिसराची व्यवस्थित डागडुजी व अन्य सोयी-सुविधा तेथे पुरवाव्या लागणार आहेत.

सुरक्षा दलास विशेष प्रशिक्षण
सरकारचा प्रकल्प असल्याने विमानतळावर सुरवातीच्या टप्प्यात राज्य पोलिसांचे सुरक्षाकवच तैनात असेल. विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेसंदर्भात पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी प्रशिक्षण देतील. या सर्व व्यवस्था झाल्यानंतरच विमानतळावरून ‘टेकऑफ’ होऊ शकेल. या व्यवस्थांच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com