आक्रमक शेतकऱ्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्सचे लिलाव बंद पाडले

nampur
nampur

नामपूर (नाशिक) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्सचे लिलाव आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले. शेतकरी नेत्यांच्या पवित्र्यामुळे जिल्हा बँक प्रशासनाला बॅकफूटवर यावे लागले. शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा अशा प्रकारे बेकायदेशीर लिलाव करण्याचा अधिकार जिल्हा बँकेला दिला कुणी, असा आर्त सवाल यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. बँकेच्या सक्तीच्या वसूली मोहिमेविरोधात पुढील आठवड्यात जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.  

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे ताब्यात घेतल्यानंतर अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हा बँकेच्या थकित कर्जवसूलीस प्राधान्य दिले आहे. त्यानुसार थकित कर्जपोटी शेतकऱ्यांची वाहने वसूली पथकाच्या माध्यमातून जमा करुन त्यांच्या लिलावातून थकित कर्जची रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हा बँकेच्या प्रशासनाने सर्व शाखांना दिले आहेत. त्यानुसार नामपूर विभागात शेतकऱ्यांचे ३५ ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले होते. त्यापैकी १७ ट्रॅक्टर्सचा लिलाव मंगळवारी (ता. २०) नळकस रस्त्यालगत असणाऱ्या शिवनेरी कॉलनीत घेण्यात येणार होता. परंतु लिलाव सूरु झाल्याची कुणकुण लागताच शेतकरी संघटनेचे नेते खेमराज कोर, तालुकाध्यक्ष भास्कर सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सोनवणे, नामपूर बाजार समितीचे संचालक दिपक पगार, समिर सावंत, राजीव सावंत, दगा बच्छाव, रमेश अहिरे आदीनी लिलावात हस्तक्षेप करून लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांची वाहने कुणीही विकत घेऊ नये, असे आवाहन लालचंद सोनवणे यांनी यावेळी केले.

शेतकरी संघटनेचे नेते खेमराज कोर यावेळी म्हणाले की, जिल्हा बँकेच्या संचालकांकडे कोट्यावधी रूपयांचे कर्ज असताना शेतकऱ्यांनाच का वेठीस धरले जात आहे. मोसम खोऱ्यातील नागरीकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. एकेकाळी बागयती शेतीसाठी प्रसिद्ध असणारे मोसम खोरे गेल्या तीन चार वर्षांपासून आसमानी व सुलतानी संकटांना तोंड देतो आहे. शेतकरी शेतमालाचे बाजारभाव कमालीचे घसरल्याने पुरता हतबल झाला आहे. गारपीट, अवकाळी पाऊस, कांदा, डाळिंब, द्राक्ष, शेवगा या नगदी पिकांचे घसरलेले भाव, आदी बाबींमुळे शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र कोलमडल्याने शेतीवरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे काळाची गरज आहे. यावेळी लालचंद सोनवणे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर सोनवणे, दिपक पगार यांनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलन काळात जायखेड़ा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीराम कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्सचे लिलाव बंद पाडल्यानंतर आगामी काळात जिल्हा बँक प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी देवळा येथील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र शेवाळे, प्रगतशील शेतकरी दिपक अहिरे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष किरण सावंत, संजय जाधव, रामदास ठाकरे, नळकस येथील सरपंच मधुकर देवरे, सटाणा येथील प्रगतशील शेतकरी देविदास सोनवणे, खाकुर्ड़ी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चेतन देवरे, पवन पाटील, भूषण ठाकरे, जिल्हा बँकेचे नाशिक येथील मुख्य व्यवस्थापक किशोर कदम, विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे, बँक निरीक्षक राजेंद्र गांगुर्डे, शामराव अहिरे, जिल्हा बँकेचे कर्मचारी आदिंसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. आंदोलन काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com