अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजार गजबजला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

जळगाव - ‘आखाजी’ अर्थात अक्षयतृतीयेनिमित्त घरोघरी घागर भरण्यात येत असतात. शिवाय, आंब्याचा रस व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्याअनुषंगाने अक्षयतृतीयेच्या पूजेसाठी लागणारी घागर व आंबे खरेदीसाठी आज पूर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली होती. 

जळगाव - ‘आखाजी’ अर्थात अक्षयतृतीयेनिमित्त घरोघरी घागर भरण्यात येत असतात. शिवाय, आंब्याचा रस व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्याअनुषंगाने अक्षयतृतीयेच्या पूजेसाठी लागणारी घागर व आंबे खरेदीसाठी आज पूर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली होती. 

पारंपरिक सण- उत्सवांत अक्षयतृतीयेला महत्त्व आहे. सासुरवाशीण मुली माहेरी येतात. तसेच नोकरी- व्यवसायानिमित्त बाहेर असलेले कुटुंबीय गावी येतात. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने घागर पूजनाला अधिक महत्त्व आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदीसाठी आज बाजारात गर्दी झाली होती. प्रामुख्याने यात आंबे, घागर, खरबूज खरेदी करत होते. तसेच जेवणासाठी केळीच्या पानांनाही आज मागणी होती.

हातगाडीवर ठिकठिकाणी विक्री 
शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून आंब्याच्या विक्रीला सुरवात झाली आहे. परंतु, आखाजीच्या पार्श्‍वभूमीवर आंब्यांची आवक वाढली असून सुभाष चौक, दाणा बाजार, गांधी मार्केट, टॉवर चौक, गोलाणी व्यापारी संकुलासह अन्य चौक व रस्त्यांवर हातगाडीवर विक्रेत्यांनी आंब्यांची विक्री केली जात होती. विशेषतः केसर, बदाम आंब्यांना अधिक मागणी होती. सकाळपासून बाजारात असलेली गर्दी सायंकाळी उशिरापर्यंत कायम होती. आंब्यासोबत घागर, खरबुजांनाही मागणी होती. शहरातील विविध रस्त्यांवर घागर आणि खरबूज विक्रेत्यांनी दुकाने मांडली होती. टावर चौक ते चौबे शाळापर्यंतच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी घागरी विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. यात घागरींची किंमत ५० ते ६० रुपये, तर खरबुजाचा दर प्रतिकिलो २५ ते ३० रुपये होता.