"जलसंपदा'च्या उदासीनतेमुळे हक्काचे पाणी गुजरातकडे..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

धुळे - साक्री व धुळे तालुक्‍याला वरदान ठरणारा अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरेल, अशी खात्री होती. मात्र, जलसंपदा विभागाने आठ वर्षांपासून मोबदल्यासह सय्यदनगरच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न रेंगाळत ठेवल्याने या प्रकल्पात सध्या भरमसाट पाणी येऊनही ते पांझरा नदीतून तापीमार्गे गुजरातकडे सोडून देण्याची वेळ जिल्ह्यावर ओढवली.

धुळे - साक्री व धुळे तालुक्‍याला वरदान ठरणारा अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरेल, अशी खात्री होती. मात्र, जलसंपदा विभागाने आठ वर्षांपासून मोबदल्यासह सय्यदनगरच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न रेंगाळत ठेवल्याने या प्रकल्पात सध्या भरमसाट पाणी येऊनही ते पांझरा नदीतून तापीमार्गे गुजरातकडे सोडून देण्याची वेळ जिल्ह्यावर ओढवली.

पुरेशा निधीसह राजकीय श्रेयवादात तब्बल 32 वर्षे वेठीस धरला गेलेला निम्न पांझरा अक्कलपाडा (ता. साक्री) मध्यम सिंचन प्रकल्प आता शंभर टक्के पूर्ण झाला आहे. साक्री तालुक्‍यावरील वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्रात एकमेव अक्कलपाडा प्रकल्प "ओव्हर फ्लो‘ झाला आहे, असे असताना तो पूर्ण क्षमतेने भरला, असा प्रत्येकाचा समज व्हावा. मात्र, सिंचन विभागाने गेल्या मंगळवारपासून (ता. 9) या प्रकल्पातून कोट्यवधी लिटर पाणी सोडून दिल्याने धुळे शहरातील पांझरा नदी खळखळून वाहताना दिसते आहे. ते पाहून आपले हक्काचे पाणी तापी नदीमार्गे गुजरातच्या उकई धरणात आणि पुढे समुद्रात जात असल्याचे शल्य धुळेकरांना बोचते आहे.

दीडशे कुटुंबांचा प्रश्‍न
प्रकल्पबाधित सय्यदनगरच्या पुनर्वसनांतर्गत सरासरी 150 कुटुंबांच्या मोबदल्याचा प्रश्‍न आठ वर्षांत सुटू न शकल्याने पाण्याची डोळ्यांदेखत नासाडी पाहण्याची वेळ धुळेकरांवर आली आहे. पाणी सोडून देण्याचा निर्णय हा दुष्काळाशी सामना करणाऱ्या धुळे, साक्री तालुक्‍याची थट्टा करणारा असल्याची प्रखर टीका करत यासंदर्भात झारीतील शुक्राचार्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची भूमिका माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी जाहीर केली, ती याच पार्श्‍वभूमीवर आहे.

झारीतील शुक्राचार्य कोण?
प्रकल्प पूर्ण होऊनही जलसंपदा विभागाची मोबदला वाटप प्रक्रियेबाबत उदासीनता आणि यासंबंधी निर्णयातील अक्षम्य दिरंगाई, डाव्या कालव्यासह अन्य काही कामांत वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे या प्रकल्पाच्या लाभापासून शेतकरी, ग्रामस्थांना यंदाही वंचितच राहावे लागेल, हे आता स्पष्ट झाले आहे. विरोधाला विरोधाचे राजकारण आणि निवडणुकांतील राजकारणाचाच हा परिपाक आहे. या स्थितीस कारणीभूत झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. तथापि, मध्यम प्रकल्प विभागाने सय्यदनगरच्या पुनर्वसनाबाबत रखडलेल्या प्रश्‍नाकडे बोट दाखवून सुटका करून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्य
अक्कलपाडा प्रकल्पास 30 जानेवारी 1984 ला मान्यता मिळाली. निधीअभावी काम रखडत गेल्यानंतर प्रकल्पस्थळी 17 दरवाजे बसविण्याचे काम 24 जुलै 2013 ला पूर्ण झाले. एका दरवाजाची बारा मीटर रुंदी व आठ मीटर उंची, तर प्रकल्प 31.18 मीटर उंचीचा आहे. यात साडेबारा हजार हेक्‍टरवर सिंचन लाभाची क्षमता आहे. धुळे शहरासह औद्योगिक वसाहतीसाठी अनुक्रमे 7.99 व 8.50 दशलक्ष घनमीटर जलसाठा या प्रकल्पातून आरक्षित आहे. 

Web Title: The apathy claim jalasampada water Gujarat ..!