रक्तदान, अवयवदानाची शपथ हाच आज लग्नाचा आहेर 

swapnil-varsha
swapnil-varsha

नाशिक : पर्यावरणाची, अवयव दानाची, गुढी वेगळी हर्षाची..., सहजीवनाच्या आरंभाची घटिका स्वप्नील -वर्षाची...! या आपण सर्व सामाजिक सामीलकीचे सहजीवन आरंभाला... रक्तदान- अवयवदानाची शपथ हाच असेल आमचा लग्नाचा आहेर, असे विवाहाचे आमंत्रण दिले आहे, ते कुणी सामाजिक किंवा राजकीय कुटुंबाने नव्हे, तर सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त व सहाय्यक उपायुक्त (भविष्यनिर्वाह निधी) या अधिकारी जोडप्याने. 

कळवण येथील मूळ रहिवासी असलेले स्वप्नील कोठावदे (आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त म्हणून कार्यरत आहे) तर त्यांच्यासोबत सहजीवनाचा प्रारंभ करणाऱ्या नाशिक येथील श्रमिकनगरातील रहिवासी वर्षा पगार कर्नाटक राज्यात भविष्यनिर्वाह निधी विभागात सहाय्यक उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. हे दोघे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 18 मार्चला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांनीही आहेर मागितलाय... तो येताना अवयवदानाची शपथ आणि रक्तदानाचा संकल्प सोबत आणायला विसरू नका... असं आग्रहाचं निमंत्रण त्यांनी दिलंय. 

स्वप्नील कोठावदे म्हणाले, की लग्नात सर्व कुटुंबीय एकत्र येतात. अनेक लोक भेटतात. त्यामुळे विवाह अवयवदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. एखादा व्यक्ती जगणार नसेल तर तो इतरांना आयुष्य देऊ शकतो. भारतात अवयवदानाबाबत हळूहळू जनजागृती होतेय. अवयवदान आणि अवयवांची मागणी यांच्यात फार मोठी तफावत आहे. देशात दहा लाख लोकांमागे फक्त 0.58 व्यक्ती अवयवदानाचा निर्णय घेतात. अवयवांच्या प्रतीक्षेत लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे ही प्रतीक्षायादी कमी करायची असेल तर अवयवदानाचं महत्त्व घराघरांत पोचलं पाहिजे. 

वर्षा पगार म्हणाल्या, की लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही सरकारी नोकरी निवडली. अवयवदानाने लोकांना नवसंजीवनी मिळू शकते. आमच्या लग्नात आम्ही पहिल्यांदा रक्तदान करणार आहोत. यासाठी नाशिक वैद्यकीय महविद्यालयाची टीम उपस्थित असेल. नर्सिंग कॉलेजच्या मुली लग्नाला आलेल्यांना अवयवदानाची माहिती देतील. त्याचसोबत एक अवयवदानाची शपथ देण्यासाठी अर्ज देतील. आमच्या लग्नात आवाज नसेल. कारण लग्न इकोफ्रेंडली पद्धतीने करण्याचं आम्ही ठरवलंय आहे. 
जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्रप्रमुख असलेले शरद व शिक्षिका सुरेखा कोठावदे यांनी सांगितले, की स्वप्नील व वर्षा या दोघांनी घेतलेला निर्णय आम्हाला ज्यावेळी सांगितला, त्या वेळी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शिक्षक या नात्याने आम्ही जे मुलांना सांगत असतो, त्याची कृती प्रत्यक्षात आमचा मुलगा करीत असल्याने आम्हाला अभिमान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com