बालन्यायालयात खुनाच्या संशयितावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

मोहित बावीस्कर खून प्रकरण; सूडभावनेतून पित्याच्या हातून घडली घटना
नाशिक - वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मोहित बावीस्करच्या खून प्रकरणातील अल्पवयीन संशयितावर मोहितच्या पित्यानेच बुधवारी बालन्यायालयाच्या आवारात गोळी झाडली. संशयिताने सावधगिरीने नेम चुकविल्याने गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली.

मोहित बावीस्कर खून प्रकरण; सूडभावनेतून पित्याच्या हातून घडली घटना
नाशिक - वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मोहित बावीस्करच्या खून प्रकरणातील अल्पवयीन संशयितावर मोहितच्या पित्यानेच बुधवारी बालन्यायालयाच्या आवारात गोळी झाडली. संशयिताने सावधगिरीने नेम चुकविल्याने गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली.

गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये मोहित बावीस्कर याचा त्याच्याच दोन मित्रांनी अपहरण करून खून केला आणि त्याच्या पित्याकडे 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. उंटवाडी रस्त्यावरील बालनिरीक्षण गृहातील बाल न्यायालयाच्या बाहेर आज दुपारी ही घटना घडली. मोहित बावीस्कर खूनप्रकरणी बाल न्यायालयात आज सुनावणी होती. त्यासाठी याप्रकरणातील अल्पवयीन संशयितास बाल न्यायालयात आणण्यात आले होते. त्यास न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर जिन्यामध्येच थांबलेल्या मोहित बावीस्कर याचे वडील प्रलिन बावीस्कर यांनी अल्पवयीन संशयितांच्या दिशेने गोळी झाडली; परंतु अल्पवयीन संशयिताने सावधगिरीने नेम चुकविल्याने गोळी त्याच्या डाव्या हाताच्या खांद्याला चाटून गेली. गोळी झाडल्यानंतर प्रलिन बावीस्कर हे फरारी झाले. जखमीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुलाच्या वियोगातून पित्याचा हल्ला
प्रलिन बावीस्कर यांचा मुलगा मोहित बावीस्कर हा नाशिकमध्ये आयआयटीच्या अभ्यासासाठी गोळे कॉलनी परिसरात राहत होता. मोहितच्या खुनाचे वृत्त ऐकून आजोबा दोधा बच्छाव यांना जबर झटका बसून त्यांचे निधन झाले, तर त्यांच्या आईवरही विपरित परिणाम झाला. घटनेने बावीस्कर कुटुंब खूपच तणावाखाली आले. खुनाच्या घटनेतील मुख्य संशयित अल्पवयीन असल्याने त्यास फारशी शिक्षा होणार नाही, याची चर्चा होती. त्यामुळे एकीकडे मुलाचा वियोग, कुटुबीयांची खालावलेली मानसिकता आणि दुसरीकडे संशयित मोकाट सुटणार, या भावनेतून मोहितचे वडील प्रलिन बावीस्कर यांनी सदरचा हल्ला केल्याची चर्चा आहे.

Web Title: The arrested accused of the murder of a child in court firing