'सैराट' सरकारचा 'झिंगाट' कारभार - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

राज्यातील युती सरकारमधील मंत्र्याचा कुणाचा पायपोस कुणालाही नाही, कोण काय करतय कुणालाच कळत नाही, जनतेकडेही लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, राज्यातील सर्व कारभारच झिंगाट सुरू आहे. दोन्हीं पक्ष लुटूपूटूचे भांडण करीत आहे.

जळगाव - राज्यातील युती सरकार "सैराट' झाले असून त्यांचा कारभार "झिंगाट' सुरू आहे. असा झणझणीत टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या जाहिर सभेत ते बोलत होते.

जिल्हा परिषद निवडणूकीत जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. जामनेर तालुक्‍यातील गट आणि गणात दोन्ही पक्षाची आघाडी झाली आहे. आघाडीच्या नेत्यांची जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराची पहिलीच सभा जामनेर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार भाई जगताप, माजी मंत्री नितीन राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरूणभाई गुजराथी,जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, राज्यातील युती सरकारमधील मंत्र्याचा कुणाचा पायपोस कुणालाही नाही, कोण काय करतय कुणालाच कळत नाही, जनतेकडेही लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, राज्यातील सर्व कारभारच झिंगाट सुरू आहे. दोन्हीं पक्ष लुटूपूटूचे भांडण करीत आहे. दिवसा ते एकत्र असतांत तर रात्री त्यांची एकमेकावर आरोप प्रत्यारोपांची भांडणे सुरू होतात. शिवसेनेचे मंत्री खिशात मंत्रीपदाचा राजीनामे घेवून फिरत र्असल्याचे सांगतात, परंतु प्रत्यक्षात ते राजीनामे देत नाही. दोन्ही पक्ष जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत.ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनाच विजयी करा असे अवाहनही त्यांनी केले.