प्रतिकूल परिस्थितीत अश्विनीने मिळविले ९६.४० टक्के गुण

sataNa.jpg
sataNa.jpg

सटाणा : घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले तर वडील शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिकण्याची जिद्द असलेल्या येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील अश्विनी मुकुंद अहिरराव या विद्यार्थिनीने दहावीत ९६.४० टक्के गुण मिळवत बागलाण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिची यशोगाथा प्रेरणादायी असून आजच्या विद्यार्थिनींसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे.

परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्या आई - वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी अश्विनीने प्रशासकीय सेवेत उच्च पदावर पोचण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. शहरातील सोनार गल्लीतील छोट्याशा खोलीत वास्तव्यास असलेल्या अश्विनीचा कौटुंबिक आणि शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर होता. अश्विनीच्या आईचे दीर्घ आजाराने गेल्या दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मोठ्या बहिणीचा विवाह गेल्या वर्षी झाला. घरात वयोवृद्ध आजोबा व आजी असून सध्या कुटुंबाची सर्व जबाबदारी तिच्या वडिलांवरच आहे. वडील मुकुंद अहिरराव हे शिंपी समाजातील सामाजिक कार्यकर्ते असून समाजातील लग्नकार्य, गृहप्रवेश, दहावे बाराव्याचे आमंत्रण पोचविण्याचे काम अल्प मानधनावर करतात. कुटुंबाची गरज म्हणून ते शिवणकाम व सटाणा मर्चंट्स बँकेत अल्पबचत प्रतिनिधी म्हणून काम देखील करत असतात. 

अश्विनी घरातील स्वयंपाकासह धुणीभांडी व इतर सर्व कामे करून आईची उणीव भरून काढत असते. शिक्षणासाठीचा खर्च कुटुंबियांना पेलवणारा नव्हता. तरीही प्रचंड इच्छाशक्ती व शिकण्याच्या जिद्दीमुळे तिने शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळविले होते. आपल्या लहानश्या घरात स्वयं अध्ययन या पद्धतीचा वापर करून तिने दहावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे. मात्र गुणवत्ता असूनही आता नाशिक, पुणे, मुंबई येथे पुढील महागडे शिक्षण घेणे अश्विनीला परवडणारे नाही. त्यामुळे सटाणा महाविद्यालयातच प्रवेश घेऊन पुढील शिक्षण घ्यावे आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी व्हावे अशी तिची इच्छा आहे. 

अश्विनीने मिळविलेल्या या यशाबद्दल नाशिक जिल्हा व बागलाण तालुका शिंपी समाज युवक मंडळातर्फे आज रविवार (ता.१०) रोजी तिचा सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तिला भेटवस्तूही देण्यात आली. माजी समाजाध्यक्ष दिलीप खैरनार, नाशिक जिल्हा शिंपी समाज युवक अध्यक्ष प्रा. ललित खैरनार, जिल्हा युवक सचिव जयेश सोनवणे, बागलाण तालुका शिंपी समाज युवक अध्यक्ष प्रा. स्वप्नील जाधव, रोशन खैरनार, सटाणा शहर अध्यक्ष संदीप सोनवणे, संजय खैरनार, तेजस बागुल, रवींद्र चव्हाण, वैष्णव भामरे, योगेश भामरे, किरण अहिरराव, साकेत खैरनार, मुकुंद अहिरराव, संदीप अहिरराव, स्वप्नील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. अश्विनीला पुढील शिक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष खैरनार यांनी यावेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com