चाळीसगाव: बेलगंगा कारखान्यात 'रोलर' पूजन 

Belganga Sugar Factory
Belganga Sugar Factory

चाळीसगाव : बेलगंगा सहकारी साखर कारखान्यात आज अंबाजी कंपनीतर्फे "रोलर' पूजन करून दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विविध विभागातील यंत्रसामुग्रीच्या दुरुस्ती कामाला वेग आला आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये कारखाना गळीत हंगाम काढण्यासाठी सज्ज होईल, असा विश्‍वास अंबाजी ग्रुपने व्यक्त केला. 

जिल्हा बॅंकेकडून लिलाव प्रक्रियेद्वारे अंबाजी ग्रुपने कारखाना विकत घेतल्यानंतर येणाऱ्या विविध अडचणींना तोंड देत, कारखान्यात मशिनरी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी तज्ज्ञांची नियुक्ती कंपनीने केली आहे. याशिवाय कारखान्यात यापूर्वी काम केलेल्या काही कामगारांनाही पुन्हा घेतले आहे. कारखाना जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतल्यानंतर तो बंदच होता. त्यामुळे आतील यंत्रसामुग्री पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे. त्यामुळे अंबाजी कंपनीने मुख्य अभियंता म्हणून अर्जुन शिंदे, मुख्य रसायनशास्त्रज्ञपदी अशोक मेमाणे यांची तर शेतकी अधिकारी म्हणून सुभाष भाकरे यांची नियुक्‍ती केली असून या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या दुरुस्तीला सुरवात झाली आहे. आजच्या पूजनप्रसंगी चित्रसेन पाटील, केदारसिंग पाटील, प्रवीण पटेल, दिलीप चौधरी, विजय अग्रवाल, किरण देशमुख, नीलेश निकम, प्रेमचंद खिवसरा, डॉ. मुकुंद करंबेळकर, डॉ. अभिजित पाटील, अजय शुक्‍ल, जगदीश पाटील, उद्धवराव महाजन, शरद मोराणकर, श्री. ब्राह्मणकार यांच्यासह कंपनीचे संचालक व शेतकरी उपस्थित होते. 

4 लाख टन होणार गाळप 
कारखान्यातील सध्याची यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करून काही नवीन साहित्य आणल्यानंतर पाच महिन्यात कारखान्याकडून जवळपास 4 लाख मेट्रीक टन ऊस गाळप केला जाईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. कारखान्यात 60 टनाचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजनकाटे बसविण्यात येणार आहेत. कारखान्यातील 70 टनाची क्षमता असलेल्या तीन बॉयलरचीही दुरुस्ती झाली. आज विधीवत पूजन करून "रोलर' यंत्रावर बसविण्यात आले. 

सुपारी देऊन केली मोडतोड 
हा कारखाना कुठल्याही परिस्थिती सुरू होऊ नये, यासाठी अक्षरशः सुपारी देऊन कारखान्यातील यंत्रसामुग्रीची मोडतोड केल्याचा आरोप चित्रसेन पाटील यांनी केला. कारखान्यात दीड व अडीच किलो मेगावॅटचे दोन टर्बाईन असून कारखाना विक्रीची निविदा निघताच माहितीगार व्यक्‍तीने या टर्बांइनमधील वाईंडिंग कापले. पुन्हा वाईडिंग करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे हेतू पुरस्सर केलेले हे कृत्य ज्यांना कारखाना सुरू होऊ द्यायचा नाही, असेच लोक करु शकतात असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com