सेवाकार्य उपक्रमांपुरते मर्यादित न राहता चळवळ बनावे - भरत अमळकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

जळगाव - ‘जो करी कर्म अहेतू निरंतर... वेद तयास कळो न कळो रे...’ या ओव्यांप्रमाणे समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती आहेत. कुठल्याही अपेक्षेविना ते सामाजिक उपक्रम राबवीत असले, तरी आपल्याला समाजाचे मूळ प्रश्‍नच कळलेले नाहीत. हे प्रश्‍न समजून घेत ते सोडविण्यासाठी म्हणून सेवाकार्ये उभी राहिली पाहिजेत आणि ती तत्कालिक उपक्रमांपुरती मर्यादित नसावीत, तर त्यातून चळवळ निर्माण व्हावी, असे मत केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक भरत अमळकर यांनी व्यक्त केले.

जळगाव - ‘जो करी कर्म अहेतू निरंतर... वेद तयास कळो न कळो रे...’ या ओव्यांप्रमाणे समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती आहेत. कुठल्याही अपेक्षेविना ते सामाजिक उपक्रम राबवीत असले, तरी आपल्याला समाजाचे मूळ प्रश्‍नच कळलेले नाहीत. हे प्रश्‍न समजून घेत ते सोडविण्यासाठी म्हणून सेवाकार्ये उभी राहिली पाहिजेत आणि ती तत्कालिक उपक्रमांपुरती मर्यादित नसावीत, तर त्यातून चळवळ निर्माण व्हावी, असे मत केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक भरत अमळकर यांनी व्यक्त केले.

‘सकाळ’च्या येथील औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयात आयोजित ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात संवाद साधताना ते बोलत होते. तत्पूर्वी, निवासी संपादक विजय बुवा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सहाय्यक वृत्तसंपादक अतुल तांदळीकर उपस्थित होते. 

मूळ रावेर तालुक्‍यातील रहिवासी असलेल्या श्री. अमळकर यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण रावेरमध्येच झाले. त्यानंतर त्यांनी अमळनेर महाविद्यालयात पीडी/इंटरसायन्सचा अभ्यास सुरू केला. पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणाची संधी मिळत असताना, केवळ परिस्थितीमुळे जाऊ न शकल्याने त्यांनी १९७८-७९ मध्ये शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेत स्थापत्यशास्त्र (सिव्हिल) शाखेतील ‘डिप्लोमा’ पूर्ण केला.

सामाजिक कार्याचा ‘टर्निंग पॉइंट’
अमळनेर येथे होस्टेलमध्ये असताना देशात आणीबाणी लागू झाली आणि त्यावेळी महाविद्यालयातील प्रा. पंडित यांना तुरुंगात जावे लागले. आणीबाणीतील एकूणच स्थिती, वृत्तपत्रांवरील निर्बंध, तुरुंगवासाने प्रा. पंडित यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत पाहून सामाजिक कार्याची वेगळी जाणीव मनात निर्माण झाली, तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांनी विविध पत्रकांचे वाटप करीत सत्याग्रह सुरू केला. त्या वेळची परिस्थिती खऱ्या अर्थाने आयुष्याची ‘टर्निंग पॉइंट’ ठरली. आणीबाणीत दोन-तीन महिने तुरुंगवासही भोगावा लागला.

‘सकाळ- डीसीएफ’च्या उपक्रमांत सक्रिय सहभाग
‘सकाळ’च्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’बद्दल कौतुक करताना श्री. अमळकर म्हणाले, की अभिजित पवारांच्या संकल्पनेतील हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. दोन महिन्यांपूर्वी ‘डीसीएफ’च्या मुंबईत आयोजित परिषदेला काही अपरिहार्य कारणास्तव जाऊ शकलो नाही, याची खंत आहे. मात्र, हा उपक्रम समाजासाठी उपयुक्त आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानचा सक्रिय सहभाग असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

...तर चांगले शिक्षक कसे घडणार?
विवेकानंद प्रतिष्ठानमधील शिक्षकांच्या गुणवत्तेबद्दल तक्रारीचा अनुभव सांगताना श्री. अमळकर म्हणाले, की एका सुज्ञ पालकाने शिक्षकाच्या गुणवत्तेबद्दल तक्रार केली. तक्रार योग्य होती; पण मी त्या डॉक्‍टर पालकांना म्हटले, ‘आपली मुलगी हुशार आहे; मग तिला आपण भविष्यात शिक्षक करणार काय...?’ यावर ते पालक संतापले. जर हुशार विद्यार्थी डॉक्‍टर, इंजिनिअर, अधिकारी होत गेले, तर चांगले शिक्षक कसे घडणार...? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. भावगीते, शास्त्रीय संगीतासह सिनेगीत ऐकायला, भरपूर वाचन करण्याची आवड असल्याचे श्री. अमळकर आवर्जून सांगतात.

 

Web Title: bharat amalkar talking