गोड जेवणासह मेळावा घेऊन भुजबळ भक्त काढणार आपली दाढी

sunil paithankar & vishnu
sunil paithankar & vishnu

येवला - मी येतो मग काढू तुझी दाढी...असे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आनंदाच्या स्वरात आपले समर्थक सुनील पैठणकर यांना सांगितले. भुजबळांना अटक झाल्यापासून गेल्या ७८५ दिवसांपासून पैठणकर यांनी दाढी वाढविली आहे. भुजबळांवरील भक्तीपोटी पैठणकरांसह येथील समता परिषदेचे शहराध्यक्ष विष्णूपंत कर्हेकर यांनी देखील १४ मार्च २०१६ पासून दाढी वाढविली आहे. पैठणकर यांनी तर भुजबळांच्या उपस्थितीत गोड जेवणासह कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन दाढी काढण्याचा संकल्प केला आहे.

येवला म्हणजे मागील बारा वर्षांत भुजबळांचा बालेकिल्लाच आहे. किंबहुना भुजबळांचे येथे समर्थकच नव्हे तर अनेक भक्त देखील यादरम्यान तयार झाले. भुजबळांनी सर्वांवर केलेले प्रेम आणि मतदारसंघाला विकासातून दिलेली दिशा राज्यभर गवगवा करणारी ठरली आहे. मनोमन का होईना विरोधकही त्यांच्यावर निस्सीम प्रेम करतात हे मान्यच करावे लागेल. अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे कार्य देखील भुजबळांनी येथे केले. असे असतांना अचानकपणे विविध आरोपांच्या फेऱ्यात ते अडकले आणि चौकशीसाठी त्यांना अटकही झाली. खरं तर भुजबळांसारख्या बाहुबली नेत्याला अटक होऊन तब्बल दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले, ही भल्याभल्यांना न पचणारी गोष्ट आहे. मात्र तसे प्रत्यक्षात घडले आहे.

भुजबळांना अटक झाली तेव्हा ते काही दिवसांतच बाहेर येतील असाही अंदाज अनेकांना होता. मात्र आपल्या नेत्यांवर राजकीय खलबतातून झालेला अन्याय असल्याने त्याचा निषेध म्हणून येथील त्यांचे निस्सीम समर्थक पैठणकर व कर्हेकर यांनी त्याच वेळी मनोमन ‘पण’ केला होता. जोवर भुजबळांची तुरुंगातून सुटका होत नाही तो पर्यंत दाढी काढणार नाही, असा अनोखा संकल्प पुढचा मागचा विचार न करता त्यांनी त्यावेळी केला. 

सुरुवातीला गमतीचा, चेष्टेचा आणि दुर्लक्षित असलेला विषय नंतर मात्र या दोघांची भुजबळांवरील असलेली निष्ठा व प्रेम यांचे प्रतीक बनला किंबहुना पैठणकर, कर्हेकर यांच्या कुटुंबात एक दोन प्रसंग असे घडले की प्रथा परंपरेनुसार त्यांना दाढी करणे अनिवार्य होते. मात्र कुटुंबाची समजूत घालत या दोघांनी आपला पण अशा हळव्या प्रसंगी देखील मोडला नाही हे विशेष!

आज या दोघांच्या दाढीला तब्बल ७८५ दिवस झालेत. या काळात दाढीचा केसही त्यांनी कापलेला नाही. आता भुजबळांची जामिनावर सुटका झाल्याने या दोघांचा पण पूर्ण झाला आहे. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्याने दोघेही समर्थक दाढी काढणार आहेत. मात्र त्यासाठी देखील त्यांनी पुन्हा एकदा भुजबळ भक्ती दाखविली आहे. पैठणकर यांनी तर भुजबळ जेव्हा येवल्याला येणार आहेत तेव्हा संकल्पपूर्ती मेळावा घेऊन समर्थकांना गोड जेवण देत हा आनंद साजरा करूनच दाढी काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

आज जेव्हा ते मुंबईत भुजबळांना भेटायला गेले तेव्हा भुजबळांनी 'मी येतो मग तुझी दाढी काढू..' असे म्हणत आपल्या समर्थकांच्या या कृतीचे मनोमन कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com