एकेकाळची ‘भुसावळ सुंदरी’ जागतिक सौंदर्य स्पर्धेत चमकली

एकेकाळची ‘भुसावळ सुंदरी’ जागतिक सौंदर्य स्पर्धेत चमकली

सुचेता ऊर्फ वैष्णवी अग्निहोत्री यांनी केले भारताचे प्रतिनिधित्व

भुसावळ - येथे एकेकाळी झालेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘भुसावळ सुंदरी’ हा बहुमान मिळविलेल्या पूर्वाश्रमीच्या सुचेता कुळकर्णी व आताच्या वैष्णवी अग्निहोत्री यांनी जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘मिसेस टॉप ऑफ दी वर्ल्ड’ स्पर्धेत त्या सेकंड रनरअप ठरल्या आहेत.

मूर्तिमंत सौंदर्य त्यात कथक नृत्यात प्रावीण्य असल्याने सुचेता कुळकर्णी या भुसावळकरांच्या परिचित आहेत. महाविद्यालयीन जीवनात अनेक नृत्यस्पर्धेत त्यांनी पारितोषिके मिळविली आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी झालेल्या ‘भुसावळ सुंदरी’ स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता.

पुढे जळगाव सुंदरी स्पर्धेत यश मिळवून सोलापूर येथे २००५ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. तेथे ‘महाराष्ट्र कलाविष्कार’ सन्मान मिळाला होता. आपल्या अंगभूत कलेची व सौंदर्याची पुरेपूर जाणीव असल्याने लग्नानंतरही त्यांनी अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला. ‘मिसेस ठाणे सुंदरी’ म्हणूनही त्यांनी प्रथम क्रमांक विविध स्पर्धेत मिळविले. सध्या त्यांची ठाण्याला तपस्या संगीत अकादमी असून चार शाखांमधून शेकडो विद्यार्थी नृत्य व संगीताचे शिक्षण घेत आहे. २९ शिक्षक अकादमीत काम करतात. मुलगी ऋचा ही विविध वाहिन्यांच्या नृत्यस्पर्धेत चमकत असून काही टि.व्ही. सिरीअल मध्येही काम करीत आहेत. सुचेता यांनी मुलीबरोबरच आपल्याही करिअरकडे लक्ष दिले असून जागतिक सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायचाच या जिद्दीने त्या तयारीला लागल्या, सुरवातीला झालेल्या स्पर्धेत त्यांनी मिसेस भारत सुंदरी (मिसेस टियारा इंडिया) म्हणून निवड झाली. त्यामुळे दिल्ली येथील जागतिक विवाहित महिलांच्या सौंदर्य स्पर्धेत (मिसेस टॉप ऑफ दी वर्ल्ड) भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. स्पर्धेत एकूण २५ देशातील विवाहित सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. अंतिम फेरीत १५ स्पर्धांमध्ये चुरस होती. त्यात त्या सेकंड रनरअप ठरल्या. तर वैयक्तिक प्रकारात ‘मिस ब्युटी’ हा सन्मानही मिळाला. 

स्पर्धेच्या अनुभवाबद्दल ’सकाळ’शी बोलताना त्या म्हणाल्या, भुसावळला असताना मला सौंदर्य स्पर्धांचे आकर्षण होते. कारण या स्पर्धांमध्ये सौंदर्याबरोबरच आपल्यातील टॅलेंट दाखविण्याची संधी मिळते. आपला सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडून येतो. त्यामुळे लग्न झाल्यावरही या स्पर्धांमध्ये मी भाग घेत यश मिळवीत होते. एखाद्या गोष्टीत सातत्य. जिद्द व चिकाटी ठेवल्यास आपणास यश मिळत राहते, यावर माझा विश्‍वास होता. जागतिक सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणे हे आव्हान होते. ते मी स्वीकारले. त्यातही भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली हा विशेष आनंद आहे. तीन महिन्यांपासून मेहनत घेत होती. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने करीत होती. त्यामुळे तीन महिन्यात पाच किलो वजन कमी झाले. जागतिकस्तरावरील सामान्य ज्ञान मिळविण्यासाठी विविध पुस्तकांचे वाचन केले. स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी खास प्रशिक्षण रेखा मिरजकर, ऋषिकेश मिरजकर, आरती बलेरी यांनी दिले. टॅलेंट राउंड मध्ये माझी कथकनृत्यातील अदाकारी परीक्षकांना भावली. असे वैष्णवी अग्निहोत्री म्हणाल्या.

समृद्ध अनुभव
स्पर्धेतील अनुभव समृद्ध करणारा होता. इतर देशातील सौंदर्यवतींशी गप्पा मारण्याची व त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली. माझेही अनुभव मी त्यांच्याशी शेअर केले. मुकुट परिधान करताना यशाची आणखी एक पायरी आपण सर केल्याची जाणीव झाली. 

भुसावळला शिक्षण
वैष्णवी अग्निहोत्री यांचे वडील (कै.) डी. डब्लू. कुळकर्णी हे भुसावळला रेल्वेत अधिकारी होते. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण अहिल्यादेवी कन्या शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात झाले. त्यांना कथक नृत्याची आवड असल्याने त्यांनी मुकेश खपली यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. भुसावळ सुंदरी स्पर्धेत त्यांना भुसावळच्याच एकेकाळच्या भारत सुंदरी असलेल्या डायना ऊर्फ फिलोमीना अथाईड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्याआधी झालेल्या अश्‍याच स्पर्धेत त्यांना यश मिळाले नाही मात्र त्या नाराज न होता पुढील स्पर्धेत सहभागी होत राहिल्या. त्यावेळी आई आशा कुळकर्णी या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहात. वडिलांचेही  नेहमीच प्रोत्साहनच मिळत होते. 

भुसावळकरांकडून कौतुक
फेस बुक व व्हॉटसअपच्या माध्यमातून सुचेता यांनी जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केल्याचे भुसावळकरांना समजताच अनेक मित्र, मैत्रिणी व परिचितांनी तिचे फोन करून अभिनंदन केले.

पतीची समर्थ साथ  
मला लग्नानंतर जे काही यश मिळाले किंवा विविध सौंदर्य स्पर्धेत मी सहभागी होते. ते माझे पती विकास अग्निहोत्री यांची साथ असल्यानेच शक्‍य होते. स्पर्धेच्या तयारी साठी ते मला सर्वतोपरी मदत करीत असतात. विविध ड्रेस व इतर साहित्यांची खरेदी, व्यायाम करताना कधी कंटाळा आल्यास तेच प्रोत्साहित करीत होते. एवढेच नव्हे तर अभ्यास करताना तेच मला कॉफी तयार करून आणून देत होते. आमच्या तपस्या संगीत अकादमीचे व्यवस्थापन तेच सांभाळतात.  असे वैष्णवी अग्निहोत्री अभिमानाने सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com