राज्यभर धुमाकूळ घालणारी ‘बिटरगुंटा गॅंग’ जेरबंद

‘सकाळ’ने राज्यभर रोटेशन पद्धतीने बॅग लिफ्टिंगचे दिलेले वृत्त.
‘सकाळ’ने राज्यभर रोटेशन पद्धतीने बॅग लिफ्टिंगचे दिलेले वृत्त.

जळगाव - आंध्र प्रदेशातील बिटरगुंटा (जि. नेल्लूर) येथील बॅग लिफ्टिंग करून रोकड लांबविणाऱ्या सात अट्टल गुन्हेगारांसह टोळीतील तीन महिला संशयितांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीकडून गेल्या दीड वर्षातील सर्व मोठे बॅग लिफ्टिंगचे गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. एप्रिलमधील जळगावातील बॅग लिफ्टिंगच्या घटनेच्या वृत्तांकनात ‘सकाळ’ने यामागे बिटरगुंटा गॅंग असल्याचे म्हटले होते, तो अंदाज खरा ठरला आहे. 

शहरात अजिंठा चौफुलीजवळ जामनेर येथील व्यापाऱ्याचे ५४ लाख रुपयांची रोकड स्विफ्ट कारच्या दाराचे काच तोडून लांबविण्यात आली होती. नंतर १ ते ५ लाखांपर्यंत अनेक बॅग लिफ्टिंगचे गुन्हे घडले. भारतीय स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेबाहेर सापळा रचून रवींद्र भादले यांच्या स्कॉर्पिओ कारमधून २० लाखांची रोकड लांबवल्याची घटना १७ एप्रिलला भरदुपारी घडली. हा गुन्हा घडल्यानंतर एक दीड महिना विश्रांती घेत या भामट्यांनी बांधकाम व्यावसायिक नितीन माधवराव महाजन (रा.रायसोनी नगर) यांच्यावर पाळत ठेवत अग्रवाल चौकात तीन लाखांची रोकड असलेली बॅग पळवली होती. 

स्थानिक पथक मागावर 
जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय कराळे, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हेशाखा आंध्रप्रदेशातील टोळ्यांच्या मागावर होती. आंध्रप्रदेशपर्यंत या टोळ्यांच्या मागावर पथक जाऊन माघारी परतले. अखेर गुन्हेशाखेचे निरीक्षक सुनील कुराडे, उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या ‘ह्यूमन नेटवर्किंग’मधून गुप्त माहिती उपलब्ध झाल्यावर गेल्या दीड महिन्यापासून पाचोऱ्यात भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेल्या या टोळीवर मध्यरात्री गुन्हेशाखेच्या पथकाने झडप घालत तब्बल सात पुरुष आणि तीन महिला संशयितांना ताब्यात घेतले. 

श्रीकृष्णनगर-बाहेरपुरात छापेमारी 
पाचोऱ्यात गेल्या दोन महिन्यापासून आंध्रप्रदेशातील संशयित भाड्याचे घरात कुटुंबासह वास्तव्यास असल्याच्या माहितीवरून निरीक्षक सुनील कुराडे, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, नाना सूर्यवंशी, रवींद्र पाटील, नरेंद्र वारुळे, विजय पाटील,  शरद भालेराव, नुरोद्दीन शेख, यांच्यासह महिला कर्मचारी अशा दोन पथकांनी मध्यरात्रीच्या सुमारास संशयितांची खात्री झाल्यावर झडप घातली. बाबू शंकरय्या सल्ला (वय-४०), मायकल जॉन नागराज (वय-४०), राजेश रवी सल्ला (वय-२७), उदय किरण सल्ला (वय-१९), राज बाबू मायकल नागराज वय (वय-२०), संजू धानेला बलाला (वय-२५), किरण सल्ला (वय-१९) यांच्यासह महिला संशयित कल्पना किशोर कुनचाला (वय-२८), मरीयम अनाको सल्ला (वय-३८), ज्योती येशुबू गुज्जा (वय-३७) सर्व रा.कपराळा टिप्पा गाव, बिटरगुंटा (जिल्हा नेल्लूर आंध्र प्रदेश) यांना ताब्यात घेतले. छापेमारीच्या वेळी बाहेर असलेल्या दोघा तिघांच्याही मुसक्‍या लवकरच आवळण्यात येतील असे निरीक्षक कुराडे यांनी सांगितले.

‘सकाळ’ने दिली तपासाला दिशा
१७ एप्रिल २०१८ च्या स्टेट बॅंकेजवळील स्कॉर्पिओतून २० लाखांची रोकड लांबविल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावर ‘सकाळ’ने चोरट्यांची मोडस ऑपरेंडीचा अभ्यास करत त्यामागे ‘बिटरगुंटा’ गॅंग असल्याचे वृत्त दिले होते. या वृत्तावरून तपासाला दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com