बोगस लाभार्थी दिव्यांगांना बसणार चाप

- दीपक खैरनार
बुधवार, 25 जानेवारी 2017

दिव्यांगांना मिळणार आधारलिंक रंगीत युनिक कार्ड
अंबासन - बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवून दिव्यांगांच्या विविध सवलती लाटणाऱ्यांना चाप लावण्यासाठी नवीन वर्षात दिव्यांगांना रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. 

दिव्यांगांना मिळणार आधारलिंक रंगीत युनिक कार्ड
अंबासन - बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवून दिव्यांगांच्या विविध सवलती लाटणाऱ्यांना चाप लावण्यासाठी नवीन वर्षात दिव्यांगांना रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. 

या कार्डधारक दिव्यांगांना कोठेही विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी लवकरच दिव्यांगांचा नव्याने सर्वेक्षण होणार असून, बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्यांना या युनिक कार्डच्या माध्यमातून बोगस दिव्यांगांना बाहेर काढले जाणार आहे. दिव्यांगांच्या संख्येची माहिती यानिमित्ताने एकत्रित केली जाणार असल्याची माहिती राज्याचे अपंग संघटनेचे कोषाध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी धुळ्याचे आमदार अनिल गोटे, आमदार बच्चू कडू यांच्यासह अपंग संघटनांनी बोगस दिव्यांगांविरोधात आवाज उठविला होता. याचीच दखल घेऊन आता खऱ्या लाभार्थ्यांना अधिकाधिक योजनांचा लाभ घेता येणार आहे. ज्यांना अपंगत्व आले आहे किंवा एखाद्या अपघातात अपंग झाले, त्यांना सर्वसामान्यासारखे जीवन जगता येत नाही.

त्यांच्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. अनेक सवलतीसुद्धा शासन त्यांना देत आहे. एसटी बस आणि रेल्वेच्या प्रवास भाड्यात सूट मिळते. व्यवसाय उद्योगामध्येसुद्धा लाभ दिला जातो. मात्र, अलीकडे खऱ्या लाभार्थ्यांऐवजी धडधाकट नागरिक दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवून शासनाची दिशाभूल करीत सवलती लाटत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी त्यांच्या सेवा सवलतीपासून वंचित राहतात. यावर शासनाने आता सर्जिकल स्ट्राइक केले असून, सर्व दिव्यांगांचा सर्वे करून त्यांना रंगीत युनिक कार्ड दिले जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

हे कार्ड आधारकार्डला लिंक केले जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी खोटे कागदपत्र सादर करून दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळविले आहे ते यातून बाद होणार आहेत. कारण आधारकार्ड काढताना जो दिव्यांग आहे त्यांनीच दिव्यांग असल्याची माहिती दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती दिव्यांग आहेत, त्यांच्या दिव्यांगाची टक्केवारी किती आहे याची माहिती आता अधिकृतपणे एकत्रित केली जात आहे. ही माहिती एकत्र झाल्यानंतर या दिव्यांगांना ऑनलाइन अर्ज भरून द्यावे लागणार आहेत. 

अर्ज भरून दिल्यानंतर शासन अर्जात दिलेली माहिती व त्या दिव्यांगांनी आधारकार्ड काढताना दिलेली माहिती पडताळूनच नवीन युनिक आयडी तयार करून दिली जाणार आहे.

खऱ्या दिव्यांगांवर होणारा अन्याय निश्‍चितपणे आता थांबणार आहे. दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर होण्यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबविते. मात्र, बऱ्याच वेळा तांत्रिक कारणांमुळे दिव्यांगांवर अन्याय होतो. दिव्यांगांच्या उत्थानासाठी योजनांचा लाभ सहजपणे युनिव्हर्सल ओळखपत्रामुळे मिळणार आहे. त्यामुळे हे कार्ड दिव्यांगांसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज ठरणार आहे.
- सोपान खैरनार, राष्ट्रपती पुरस्कारार्थी शिक्षक

Web Title: Bogus beneficiaries handicaped keep pressure