बंद कूपनलिका, अस्वच्छतेप्रश्‍नी सदस्य नाराज

बंद कूपनलिका, अस्वच्छतेप्रश्‍नी सदस्य नाराज

जळगाव - शहरातील प्रभाग क्र. ३ मधील तसेच शिवाजी उद्यानातील कूपनलिकेचा वीजपंप गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. तसेच शहरातील विविध प्रभागांतील शौचालयांच्या अस्वच्छतेबाबत महापालिका स्थायी समिती सदस्यांनी आज नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

स्थायी समितीची सभा आज अर्धा तास उशिरा स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. व्यासपीठावर उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते.

विषयपत्रिकेवरील महापालिका अर्थसंकल्पीय तरतुदीच्या रकमेतून वाहन भाड्याने घेण्याच्या विषयावर सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी अजेंड्यात मांडलेला हा विषय मोघम आहे. त्यामुळे नेमका काय प्रस्ताव आहे समजत नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी वाहन विभागाचे सुनील भोळे यांनी हा प्रस्ताव भविष्यात महापालिकेस वाहनांची गरज भासेल तेव्हा वापरला जाणार असून, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच सदस्य चेतन शिरसाळे व महिला सदस्यांनी प्रभागांमधील शौचालयांच्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करून सफाई मक्तेदाराचे बिल का दिले जात नाही. त्यात महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता करीत नसल्यानेच अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे त्यांचे तीन महिन्यांचे बिल अदा केल्यावर स्वच्छतेचे काम तरी सुरू होईल, असे सांगितले. सभेतील विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

कूपनलिकेच्या वीजपंपाची दुरुस्ती कधी?
स्थायी समितीच्या सभेत सदस्य नवनाथ दारकुंडे, चेतन शिरसाळे व महिला सदस्यांनी त्यांच्या प्रभागांतील बंद असलेल्या कूपनलिकेचे काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून का रखडले आहे, याचा जाब विचारत पंप दुरुस्तीसंदर्भात विभागाचे सुनील खडके यांना धारेवर धरले. खडके यांनी पंप दुरुस्तीसाठी दिलेल्या दुकानदाराचे आधीचे बिल थकीत असल्याने काम करत नसल्याचे सांगितले. यावेळी स्थायी समिती सभापती खडके यांनी दुसऱ्याला काम द्या; पण लवकर काम करत जा, असे खडसावले. 

अग्निशमन अधिकाऱ्यांच्या चौकशीचे काय?
गेल्या सभेत अग्निशमन विभागाचे अधिकारी कोळी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सदस्यांनी केला होता. त्यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी चौकशीचे आश्‍वासन दिले होते. आजच्या सभेत अग्निशामक दलासंदर्भातील प्रश्‍नावेळी सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी अग्निशमन अधिकाऱ्याच्या चौकशीचे काय झाले, हा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी उपायुक्त कहार यांनी चौकशीची प्रक्रिया सुरू असून नगर सचिवांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमली आहे, असे सांगितले. यावेळी नगरसचिवांनी याबाबत कोणताही आदेश मला मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे व्यासपीठावर महापालिका प्रशासनाच्या कामाचा गोंधळ दिसून आला. उपायुक्त कहार यांनी स्थायी समितीच्या पुढील सभेत अहवाल सादर केला जाईल, असे सांगून विषय पुढे ढकला असे सांगितले. 

हुडको कर्जाचा एकरकमी अहवाल द्या
स्थायी समितीच्या सभेत हुडकोचे कर्ज एकरकमी, ऑडिट रिपोर्टसाठी सीए अनिल शहा यांना सहा महिन्यांची मुदत वाढविण्याचा प्रस्ताव सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी हुडकोची किती रक्कम बाकी आहे, किती भरले,
तेरा कोटींच्या प्रस्तावाचे काय झाले याबाबतचा सविस्तर अहवाल सभागृहाला देण्याबाबत सांगितले. यावेळी सभापती खडके यांनी पुढील सभेत अहवाल देण्याच्या सूचना केल्या. 

‘मनपा’च्या घरकुलांत जुगार
सम्राट कॉलनीतील महापालिकेच्या घरकुलांचे बांधकामस्थळी सर्रास जुगार अड्डे सुरू आहेत. याबाबत महापालिकेडे चार महिन्यांपासून तक्रार केली आहे. त्यावर अद्याप कार्यवाही का होत नाही, नाही तर त्यांना भाड्याने तरी द्या, असे सांगून सदस्य चेतन शिरसाळे यांनी नाराजी व्यक्त केली. अतिक्रमण विभागाचे अधिकारी एच. एम. खान यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून, बांधकाम विभागाला या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी आतापर्यंत केलेली नसल्याचे सांगितले.

थीम पार्क भूमिपूजनाचे निमंत्रण नाही
काव्यरत्नावली चौकात थीम पार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमास त्या प्रभागातील नगरसेवकांना का बोलाविले नाही, अशी विचारणा सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी केला. महापालिकेच्या प्रोटोकॉलनुसार त्या प्रभागातील नगरसेवकांना फोन का केला गेला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. याबाबत संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी सोनवणेंनी केली. यावेळी उपायुक्त कहार यांनी संबंधितावर कारवाईचे आश्‍वासन दिले. 

‘महिला- बालकल्याण’ची सभा रद्द
महिला- बालकल्याण विभागाची सभा स्थायी समितीच्या सभेनंतर होणार होती. या सभेच्या विषयपत्रिकेवर एकाच विषयावर चर्चा होणार होती. परंतु सभेस एकही सदस्या उपस्थित नसल्याने सभा रद्द करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com