वधू संशोधनासाठी आता मागास भागाकडे धाव

वधू संशोधनासाठी आता मागास भागाकडे धाव

सोनगीर - यंदाचा लग्नसराई हंगाम संपला, पण अनेक वर्षांपासून वधूच्या प्रतीक्षेत असलेल्या उपवर मुलांना लग्नाविनाच राहावे लागले. अशा मंडळींची आता वधू संशोधनासाठी मागास भागाकडे धाव घेणे सुरू केले आहे. यावर्षीही खानदेशातील विविध समाजांतील उपवर मुलांनी सोलापूर, तुमसर आणि विशेषतः विदर्भाच्या मागास भागातील मुलींशी मध्यस्थांमार्फत विवाह उरकल्याचे समोर आले आहे. हीच मंडळी इतरांच्या लग्नासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसू लागली आहे.

जाती-समुदायाची बंधने तोडून होत असलेले हे विवाह स्वागतार्ह असले, तरी यातील दलालांचे अर्थकारण मात्र अनेकवेळा वरपक्षाच्या फसवणुकीला कारणीभूत ठरत आहे. याचवर्षी हा फसवणुकीचा अनुभव चोपडा येथील एका कुटुंबाला आला आहे. वधूसाठी दलालांना दीड लाख रुपये मोजावे लागत आहेत.  वधू मिळवून देणाऱ्या दलालांची संख्या वाढली आहे. खानदेशातील दोन-चार समाज वगळले तर बहुतांश समाजात मुलींची कमतरता भासू लागल्याचे परिणाम वर्षागणिक अधिक तीव्रपणे दिसू लागले आहेत. अनेक वर्षांपूर्वीपासून मुलगाच हवा असल्याच्या हेक्‍याचे सामाजिक दुष्परिणाम थेट विवाहसंस्थेवर आघात करीत असल्याचे समोर येत आहे. उपवर मुलींची संख्या कमी होऊ लागल्याने नोकरदार मुलगा वगळता शेतीवाडीवाल्यासह, छोटे व्यावसायिक यांनाही आपल्या समाजात मुली मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतमजूर, कारागीर अशा तरुणांनी तर समाजातील मुलगी मिळण्याच्या आशा सोडल्याचे प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात दिसून येत आहे. 

दलालांचे अर्थकारण

खानदेशातील ही समस्या पाहता राज्याच्या सीमेवरील मागास भागातील गरीब, आदिवासींच्या मुलींशी मध्यस्थांमार्फत विवाह करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यात मात्र दलालांचे मोठे अर्थकारण सुरू झाले आहे. असे शेकडो विवाह यावर्षी खानदेशात झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, यातून वरपक्षाची फसवणूक झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशा विवाहांसाठी वरपित्याकडून एक ते दीड लाख रुपये दलालांकडून घेतले जातात. त्यातून काही रक्कम वधू पित्याला देवून एखाद्या मंदिरात लग्न व मर्यादित लोकांचे जेवण असा खर्च वगळता उर्वरित रक्कम दलालाच्या खिशात जात आहे. पण स्थानिक पातळीवर समाजातील मुलीच मिळत नसल्याने उपवर मुलांच्या पालकांना दलालांचा मोठा आधार वाटत आहे. परिणामी अशा मुलांचे पालक आतापासून अशा वधूसंशोधनात लागल्याचे दिसून आले आहे.

फसवणुकीचाही धोका

खानदेशात अशा विवाहांत काहींची फसवणूक झाली आहे. काही मुली लग्न झाल्यानंतर माहेरी गेल्या त्या कायमच्याच. वरमुलगा मात्र पैसे जाऊनही हात चोळत बसल्याची उदाहरणे समोर आले आहेत.

हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण

जळगाव  -  ९२२ 

धुळे     - ९४१ 

नंदुरबार -  ९७२

खानदेश -  ९३१ 

महाराष्ट्र - ९२५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com