'वनपीस' जागेच्या तुकड्यासाठी टपलेत "बिल्डर-बोके'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

'बिल्डर लॉबी'चा चक्रव्यूह; खासगी मध्यस्थांच्या वाऱ्या

'बिल्डर लॉबी'चा चक्रव्यूह; खासगी मध्यस्थांच्या वाऱ्या
जळगाव - शिवाजीनगरातील दूध फेडरेशनजळील जागा खाली करुन देण्यासाठी सराफा व्यावसायिक कुटुंबाला येणाऱ्या धमक्‍यांनी अशाप्रकारच्या जागांवर "बिल्डर लॉबी'ची कशी वक्रदृष्टी आहे व त्यासाठी ही लॉबी कोणत्या थराला जाऊ शकते, याचाच प्रत्यय आला. प्राईम लोकेशनच्या जागा, पडाऊ इमारती मसल पॉवरच्या जोरावर खरेदी करुन तेथे स्वत:च्या मालकीचे इमले बांधणारे अनेक राजकारणी, बिल्डर आणि त्याच्या जोडीला पोलिसातील काही पाठीराखे ठामपणे उभे आहेत. अशाच बोक्‍यांना पैशांनी भरभक्कम असलेल्या आपल्या फायनान्सरला ही जागा "वनपीस' मिळवून देण्यासाठी सर्व खटाटोप सुरु असल्याचे वृत्त हाती आले आहे.

जळगाव शहरात नवीपेठ येथील रहिवासी गीता अशोक सोनी यांच्या कुटुंबावर जागेच्या निमित्ताने ओढवलेला प्रसंग हा त्याचाच भाग आहे. सुरत रेल्वे लाईनला लागून आणि तेव्हा झोपडपट्टी जवळ असल्याने या जागेकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. नवीन सुरतलाईनचे काम पूर्ण झाले. गेल्या तीन वर्षात बखळ जागा असलेला भूखंड एनए झाला.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या परिसरात जागाच शिल्लक नसल्याने बिल्डर लॉबीची या जागेवर नजर वळली. बखळ जागा म्हणून असलेल्या या जागेचा सलग एकत्रित भूखंड मिळाल्यास मोठ्या स्कीम आखून कोटीच्या घरांत माल मिळेल म्हणून दूध फेडरेशन समोरच्या जागेचे महत्त्व आपसूक वाढले.

गीता सोनी यांच्या तक्रारी अर्जाच्या आधारे शोध घेतला असता बहुंशी तक्रारीत तथ्य असून अधिक माहिती व उभय पक्षाकडून जाणून घेण्यासाठी अर्जातील राजीव हरीओम अग्रवाल यांना संपर्क केला असता त्यांनी फोन न घेतल्याने संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक निरीक्षक जानकर यांनी अर्ज प्रकरणात माहिती घेणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले.

तीन मजली घरट्यावर वक्रदृष्टी
गीता अशोक सोनी व कुटुंबीयांनी एकत्रित कुटुंबाचा स्वप्नाचा राजमहाल उभा केला. सोनी कुटुंबाने गेल्या वर्ष- दीड वर्षात काडीकाडी जोडत तीन मजल्यांची टोलेजंग इमारत उभी राहिली. महिन्याभरात काम पूर्ण होऊन तिघा भावांचे एकत्रित कुटुंब येथे स्थलांतरित होणार होते म्हणून कुटुंबातील लहानग्यापासून वडिलधाऱ्यांना स्वप्न पूर्ण होत असल्याची जाणीव होत असतानाच या इमल्यावर वक्रदृष्टी पडली व कटकटी सुरु झाल्या.

मजूर, वॉचमनला लावले पळवून
तक्रारदार गीता सोनी यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांना येणाऱ्या धमक्‍या, मजुरांना मारहाण आदी बाबींचा उल्लेख केला आहे. त्यांच्या जागेवरील बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या वॉचमनलाही काही गुंडांकरवी धमकावून, मारहाण करुन पिटाळून लावल्याचेही समजते. आता पोलिस याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: builder lobby in jalgav