‘एमपीएससी’च्या उमेदवारांचे धरणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

‘एमपीएससी’च्या परीक्षार्थींवर होणाऱ्या अन्यायाबाबत आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. पुणे येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यात एक हजार परीक्षार्थी सहभागी झाले. अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे.
- प्रभाकर जाधव, परीक्षार्थी

जळगाव - शासकीय नोकर भरतीवरील बंदी तत्काळ उठवावी, पोलिस उपनिरीक्षक पदाची एक हजार पदे त्वरित भरावीत, एमपीएससी परीक्षा वेळेवर घ्यावी यांसह विविध मागण्यांसाठी आज एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

प्रभाकर जाधव, दत्तात्रय जाधव, विशाल पाटील, नरेंद्र देवरे, अमोल पाटील, विकास राजपूत, वैभव खाडे आदींनी नेतृत्व केले. सुमारे शंभर एमपीएससी परीक्षार्थींनी आंदोलनात सहभाग घेतला. विक्रीकर निरीक्षकपदाची भरती अद्यापही निघालेली नाही, एमपीएससी परीक्षा घेतली जाते मात्र त्याची प्रतीक्षा यादी लावण्यात येत नाही, अनेकवेळा ज्यांची निवड होते ते रुजू होत नाही. त्याजागा अद्यापही रिक्तच आहेत. यामुळे परीक्षेनंतर प्रतीक्षा यादी लावावी. २०१५ व २०१६ मध्ये अनेक रिक्त पदांच्या जागाच भरण्यात आलेल्या नाहीत. यामुळे दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. एकीकडे असणारा दुष्काळ, दुसरीकडे शासकीय नोकर भरती कपात यामुळे विद्यार्थी व कुटुंबीय आर्थिक व मानसिक संकटाला सामोरे जात आहे. या मागण्या ‘एमपीएससी’ बोर्डाकडे पोहोचविण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे करण्यात आली आहे.