‘कॅशलेस’ कामकाजासाठी ‘आपले सरकार’ उपक्रम

‘कॅशलेस’ कामकाजासाठी ‘आपले सरकार’ उपक्रम

जळगाव - राज्यात ग्रामपंचायतीद्वारे ‘आपले सरकार’ नावाने केंद्रातून डिजिटल बॅंकिंगची सुविधा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नव्या वर्षात सुरू होत आहे. ‘कॅशलेस बॅंकिंग’ कामकाजासाठी प्रत्येक गावात पूर्वीच्या संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ‘संग्राम’ केंद्रात ‘आपले सरकार’ उपक्रम सुरू करण्यात येत असून, जिल्ह्यातील ८७८ गावांत केंद्र स्थापन करून बॅंकिंग सेवा सुरू करण्याचे निश्‍चित झाले आहे.

पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आता ‘कॅशलेस’ अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही संपूर्ण व्यवहार ‘कॅशलेस’ करण्यावर भर आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी हा वापर होऊ लागला असून, प्रत्येक गावात डिजिटल बॅंकिंग सुरू करण्याच्या दिशेनेही केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींची प्रामुख्याने निवड करत तेथे ‘आपले सरकार’ केंद्र स्थापन केले जाणार आहे. या केंद्रातून नागरिकांना जन्मनोंदणी दाखल्यासह रेल्वे आरक्षणापर्यंतच्या सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

‘संग्राम’नंतर ‘आपले सरकार’
राज्यभरातील ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाइन करण्याच्या दृष्टीने २०११ ते २०१५ या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ‘संग्राम’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. परंतु, सहा महिन्यांपूर्वी हा कार्यक्रम बंद झाला असून, त्यानंतर पुढचे पाऊल म्हणून ‘आपले सरकार’ कार्यक्रम राबविला जात आहे. ग्रामविकास विभाग, माहिती- तंत्रज्ञान संचालनालय आणि सीएससी-एसपीव्ही-ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या केंद्र सरकार पुरस्कृत उपक्रमातून हा प्रकल्प चालेल. 

जिल्ह्यात ८७८ सेवा केंद्रे
ग्रामपंचायतींशी संबंधित नसलेल्या नागरिकांसाठी जिल्ह्यातील ८७८ गावांत केंद्रे कार्यान्वित करण्याचे निश्‍चित केले आहे. यात पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ३९६ ग्रामपंचायतींमध्ये स्वतंत्र सेवा केंद्र, तर १५ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या २२६ ग्रामपंचायतींकडून स्वेच्छेने स्वतंत्र केंद्र स्थापले जाणार आहेत. तसेच क्‍लस्टरप्रमाणे स्थापन केलेले २५६ अशी एकूण ८७८ सेवा केंद्रे असतील. यात सर्वाधिक संख्या जामनेर तालुक्‍यातील १०७ पैकी १०४ ग्रामपंचायतींमध्ये हे सेवा केंद्र असेल.

‘आपले सरकार’ केंद्रात असणाऱ्या सेवा
ग्रामपातळीवर नव्याने राबविण्यात येत असलेल्या ‘आपले सरकार’ या केंद्रात जन्मनोंदणी व प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र, रहिवास दाखला व प्रमाणपत्र, विवाह दाखला, नोकरी-व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र, याशिवाय रेल्वे व बस आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅंकिंग सेवा, ई-कॉमर्स, पॅनकार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ते भरणे, पासपोर्ट, वीजबिल भरणे, टपाल विभागाच्या सेवा दिल्या जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com