शहरात रमजान ईद उत्साहात साजरी

Celebrating Ramzan Id in the city
Celebrating Ramzan Id in the city

मालेगाव : शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. मुख्य पोलिस कवायत मैदानासह १८ ठिकाणी सामुदायिक नमाज पठण झाले. पोलिस कवायत मैदानावर जामा मशिदीचे पेशेइमाम माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी नमाज पढविली. मुख्य नमाज पठणात सुमारे सव्वालाख मुस्लीम बांधव सहभागी झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे शहरात तळ ठोकून होते. 

आज सकाळी साडेसातपासूनच मुस्लीम बांधवांचे जथ्थेच्या जथ्थे विविध वाहनातून नमाजपठण होत असलेल्या मैदानाकडे जात होते. मुख्य मैदानांकडे जाणारे जोडरस्ते पोलिसांनी लोखंडी बॅरेकेटींग लावून बंद केली होते. अवजड वाहनांना सकाळी अकरापर्यंत शहरात प्रवेश नव्हता. महापालिकातर्फे वजू करण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिल्लत मदरसा येथील नमाजपठणात सुमारे ५० हजार मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. चिंचमळा येथे झालेल्या नमाजपठणात १० हजार मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. यासह कालीकुट्टी, सोनापुरा कब्रस्तान, सनाउल्ला मशीद, गोल्डनगर, अश्रफी इदगाह, सेंट्रल इदगाह, इस्तेमानगर, सवंदगाव इदगाह, म्हाळदे शिवार, अरकाबे इसालत-आयेशानगर आदींसह १८ ठिकाणी नमाजपठण झाले. 

तालुक्यात दाभाडी, खाकुर्डी, झोडगे येथेही सामुदायिक नमाजपठण झाले. 

मुख्य नमाजपठणानंतर मौलाना मुफ्ती यांनी बयान करीत मार्गदर्शन केले. त्यांचा जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत आदींच्या हस्ते साफा बांधून सत्कार करण्यात आला. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना गळा भेटून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय एकात्मता चौकात झालेल्या कार्यक्रमास प्रांताधिकारी अजय मोरे, अपर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, तहसिलदार ज्योती देवरे, उपअधिक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, उपायुक्त राजू खैरनार, अखील भारतीय कॉंग्रेसचे सदस्य डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, शांतता समितीचे माधवराव जोशी, मधुकर केदारे, विजय पोफळे, हरिप्रसाद गुप्ता आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रमजान ईदचा उत्साहच न्यारा 

रमजान ईदची मुख्य नमाजपठण झाल्यानंतर शहरात पूर्व भागात ईदचा जल्लोष व उत्साह आढळून आला. यंत्रमाग कालपासूनच बंद होते. पुर्व भागातील दुकाने व हॉटेल, उपहारगृहांमध्ये मोठी गर्दी होती. मोसम चौपाटी, कॅम्प चौपाटी यावर मोठी गजबज होती. शहरातील सर्वच चित्रपटगृह हाऊसफुल होते. सर्व प्रमुख चित्रपटगृहात भाईजान सलमान खानच्या रेस-३ या चित्रपटाची धूम होती. ईदच्या पर्यटनाला उद्यापासून सुरुवात होईल. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांसह परराज्यातही या काळात बहुसंख्य नागरीक पर्यटनाला जातात. महिला माहेरी जाऊन उद्या बाशी ईद साजरी करतात. आजचा महिलांचा दिवस पाहुण्यांच्या सरबराईत जातो. महिलांवर शिरखुर्मा बनविण्याची जबाबदारी असते. हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अनेक हिंदू बांधव शिरखुर्म्याचा आस्वाद घेण्यासाठी पुर्व भागातील आपल्या मित्रांकडे गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com